Remdesivir Injection : अखेर रेमडेसिवरचा साठा संपला, ठाणे महापालिकेची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 03:35 PM2021-04-20T15:35:35+5:302021-04-20T15:36:01+5:30
Remdesivir Injection : मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रेमडेसिवरच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
ठाणे : मागील काही दिवसापासून ठाण्यात रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत होता. परंतु आता ठाणे महापालिकेकडे उपलब्ध असलेला सगळाच साठा संपला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खाजगी कोविड रुग्णालयांना मागणीनुसार रोजच्या रोज पुरवठा केला जात आहे. त्यानुसार आतार्पयत ११ हजार ६२३ रेमडेसिवरचा साठा देण्यात आल्याची जिल्ह्याधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. परंतु मागणी पेक्षा अर्धाच साठा उपलब्ध होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतु ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी मात्र आता एकही रेमडेसिवर नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रेमडेसिवरच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तारेवरची कसरत सुरु असल्याचे दिसत आहे. परंतु या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी आता शासनाकडून रुग्णालयातील मेडीकलमधूनच रेमडेसिवर विकले जाणार नसल्याचे सांगण्यात होते. त्यानंतर आता रुग्णाला रेमडेसिवर लागले तर रुग्णालयांनी ते उपलब्ध करुन द्यावे असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील खाजगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार रोजच्या रोज मागणी पेक्षा अर्धाच पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यानुसार मागील चार दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ११ हजार ६२३ रेमडेसिवरचा पुरवठा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
रोजच्या रोज येणाऱ्या पुरवठय़ानुसार ते रुग्णालयांना पुरविले जात असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेकडे सोमवारी केवळ २०० रेमडेसिवर शिल्लक राहिल्या होत्या. १८ एप्रिलपर्यंत उपलब्ध साठा मिळेल अशी आशा पालिकेला वाटत होती. परंतु पालिकेची ही आशा फोल ठरली आहे. तारीख उलटूनही अद्यापही पालिकेला एकही रेमडेसिवरचे इंजेक्शन मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही ग्लोबल रुग्णालयातही आता एकही रेमडेसिवर नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. याठिकाणी सध्या तब्बल ९५० रुग्णांवर उपचार सुरु असून साठा संपल्याने आता पुढे काय करायचे असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे. हा साठा मिळावा म्हणून पालिका जास्तीचे पैसे मोजण्यासही तयार झाली आहे. परंतु अद्यापही हा साठा उपलब्ध होऊ शकलेला नसल्याने रुग्णांना आता दुसरे कोणते मेडसिन किंवा इंजेक्शन द्यावे असा पेच पालिकेला सतावू लागला आहे.
ठाणे महापालिकेला १८ एप्रिल र्पयत पुरेसा रेमडेसिवरचा साठा मिळेल अशी आशा होती. परंतु मागणी करुनही अद्यापही हा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता इतर कोणता पर्याय उपलब्ध होतो का? याची चाचपणी सुरु आहे. तसेच रेमडेसिवरचा साठा लवकर उपलब्ध होईल अशी शक्यता आहे.
- संदीप माळवी - उपायुक्त, ठामपा
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खाजगी कोवीड सेंटरला पुरविण्यात आलेला रेमडेसिवरचा साठा
तारीख प्राप्त साठा
१६ एप्रिल - ५३२८
१७ एप्रिल - १३८५
१८ एप्रिल - २८१०
१९ एप्रिल - २१००