कल्याणमध्ये रेमडेसिवीर आऊट ऑफ स्टॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:25+5:302021-04-10T04:39:25+5:30

कल्याण : कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरातील अमेय मेडिकल या एकाच दुकानात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत ...

Remedesivir out of stock in Kalyan | कल्याणमध्ये रेमडेसिवीर आऊट ऑफ स्टॉक

कल्याणमध्ये रेमडेसिवीर आऊट ऑफ स्टॉक

Next

कल्याण : कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरातील अमेय मेडिकल या एकाच दुकानात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत होते. ते मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक रात्रभर रांगा लावत होते. मात्र शुक्रवारी या दुकानातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपला आहे. त्यामुळे इंजेक्शनसाठी रांगेत उभे असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या पदरी घोर निराशा आली. त्याचबरोबर आपल्या रुग्णाचा जीव वाचणार की नाही याची चिंता त्यांना सतावू लागली आहे. काही रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनचा स्टॉक संपला असतानादेखील दुकानासमोर रांगेत उभे होते.

रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन केवळ कल्याण पूर्व भागातील अमेय मेडिकल या एकाच दुकानात उपलब्ध होत असल्याने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, शहाड, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, ग्रामीण भागातून रुग्णांचे नागरिक अमेय मेडिकल येथे इंजेक्शनकरिता रांगेत उभे राहत होते. बुधवारच्या रात्री त्या ठिकाणी ११ वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईक रांगेत होते. इंजेक्शन देताना गोंधळ उडू नये यासाठी मेडिकलमधून टोकन दिले जाते. त्यानुसार इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनची किंमत यापूर्वी तीन ते चार हजार रुपये इतकी होती. ती नियंत्रित करण्यात आली असून आता ८९९ रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होत आहे. इंजेक्शन कालपर्यंत अमेय मेडिकलमध्ये उपलब्ध होते. शुक्रवारी या दुकानातही इंजेक्शनचा स्टॉक संपल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ठाणे, मु्ंबईला धाव घ्यावी लागणार आहे. त्यात वीकेण्ड लॉकडाऊन असल्यामुळे ठाणे, मुंबई गाठायचे कसे, असा प्रश्न काही मंडळींकडून उपस्थित केला जात आहे. हे इंजेक्शन अन्य मेडिकल दुकानांतही उपलब्ध व्हावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार इंजेक्शनची गरज नसताना केवळ पैसे उकळण्यासाठी काही खासगी डॉक्टर रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला देण्याची शिफारस करीत आहेत. त्यामुळे ही स्थिती उद्भवत आहे.

इंजेक्शनचा तुटवडा पाहता बाजारात इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान, कल्याणमधील इंजेक्शन खरेदीची गर्दी पाहून व असलेला तुटवडा पाहता कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी ५०० इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन भोईर यांना दिले. त्यावर भाजप आमदारांनी ज्यांना इंजेक्शन हवे असल्यास त्यांनी ज्यांना डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, असे स्पष्ट केले. आमदार भोईर यांचा नामोल्लेख न करता आमदार गायकवाड यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनप्रकरणी भोईर यांच्यावर निशाणा साधला आहे.

चौकट-

कल्याण-डोंबिवली महापालिकेने १२ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मागविली आहेत. सध्या पाच हजार इंजेक्शन महापालिकेकडे उपलब्ध आहेत. मात्र ही इंजेक्शन महापालिकेच्या कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी आहेत. अशा प्रकारचे नियोजन करणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

फोटो-कल्याण-आऊट ऑफ स्टॉक

----------------------

वाचली

Web Title: Remedesivir out of stock in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.