अंबरनाथ बदलापुरात खासगी कोविड रुग्णालयांना रेमडीसिविरचा पुरवठा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 08:39 PM2021-04-17T20:39:14+5:302021-04-17T20:39:28+5:30
काळ्याबाजारात हे इंजेक्शन चार ते पाचपट किमतीत विकले जात होते. असे असताना देखील गरजू रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. अखेर शासनाने रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात खासगी कोवीड रुग्णालयांना आता राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे थेट रुग्णालयातच इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांनी अंबरनाथ शहरासाठी नेमलेल्या एजन्सीमार्फत सर्व खासगी रुग्णालयांना आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. गेलं पंधरा दिवसात रेमडीसिविर आपल्या इंजेक्शनच्या प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता त्यावर तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू होते.
काळ्याबाजारात हे इंजेक्शन चार ते पाचपट किमतीत विकले जात होते. असे असताना देखील गरजू रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. अखेर शासनाने रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंबरनाथच्या सहा खाजगी कोवीड रुग्णालयांना इंजेक्शन पुरवठा करण्याची जबाबदारी शुभम इंटरप्राईजेस या एजन्सीला देण्यात आली होती. या एजन्सीकडे आज सायंकाळी सहा वाजता इंजेक्शनचा साठा आला असून एजन्सीचे संचालक संतोष गोपी यांनी सर्व इंजेक्शन रुग्णालयाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुरविण्याचे काम सुरू केले आहे. अंबरनाथच्या सहाच्या सहा खाजगी कोवीड रुग्णालयांना त्यांना आवश्यक असलेल्या रेमडीसिविर या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.
प्रत्येक दिवशी रुग्णालयाला आवश्यकता भासणार या इंजेक्शनचा आकडा आणि रुग्णांची माहिती पालिका प्रशासनाला देणे गरजेचे झाले आहे. रुग्णांच्या संख्येप्रमाणे कोविड रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार असून प्रत्येक इंजेक्शनची नोंद रुग्णालयाने ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यास काही प्रमाणात यश येणार आहे