पूर्वीच्या कवितेत धून असल्याने त्या लक्षात राहत- अरूण मैड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:20 PM2018-06-11T17:20:34+5:302018-06-11T17:20:34+5:30
कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले.
डोंबिवली : कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले.
पु.ल. कट्टा यांच्यातर्फे पाऊसधून या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाऊस कविता सादर करण्यासाठी आवाहान केले होते. त्याला कवींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सुधाकर वसईकर,सीमा झुंझारराव, सुशांत भालेराव, हिमनील बोरसे, महेश देशपांडे, विजय जाधव, विजय पंडित, गिरीष लटके, स्वाती गोडबोले-दामले, वासुदेव सांबरे, लक्ष्मीकांत धुमाळ, अथर्व खांडगे, विष्णु खांजोडे आदी कवींनी सभागृहातील प्रेक्षकांना पावसाच्या भाव विश्वात नेले. प्रत्येक क वीचा आणि कवियत्रीचा पाऊस वेगळा होता. कुणाचा पाऊस प्रेमाला साद घालणारा तर कुणाचा पाऊस आजर्व करणारा होता. कुणाचा पाऊस अवखळ, नाठाळ होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी रमेश आव्हाड होते. तसेच कट्टयाचे संयोजक अजरुन डोमाडे, सारिका घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मैड म्हणाले, ग्रेस खरंतर कुणाला कळलेच नाही असे सांगून त्यांच्या कवितेत गूढता आहे ती जाणवते पण कळत नाही. तिचे वेगवेगळे अर्थ निघतात. शांताबाई शेळके यांची ‘वादळ वार सुटलं गं’ ही कविता म्हणजे कवितेला कशी लय असावी, धून असते याचे उत्तम उदाहरण आहे. पुढच्या काळात कविता मुक्तछंदात लिहीली जाऊ लागली. त्यात दलित कवितेने जोश भरला आणि कवितेचं रूपचं पालटून टाकलं. मात्र पूर्वीच्या कविता लक्षात राहत असत. आताच्या कविता लक्षात राहत नाही, अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कवी गिरीष लटके यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विजय पंडित यांनी हिंदी आणि उर्दू कविता उत्कटतेने सादर क रून प्रेक्षकांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल डोमाडे यांनी केले.