अल्पभूधारक लढाईपासून दूरच

By admin | Published: June 3, 2017 06:10 AM2017-06-03T06:10:50+5:302017-06-03T06:10:50+5:30

ठाणे, पालघरमध्ये झपाट्याने सुरू असलेले नागरिकीकरण, उरलेल्या शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक असणे, त्याच्या

Remote | अल्पभूधारक लढाईपासून दूरच

अल्पभूधारक लढाईपासून दूरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे, पालघरमध्ये झपाट्याने सुरू असलेले नागरिकीकरण, उरलेल्या शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक असणे, त्याच्या शेतीमालावर येथील रहिवासी अवलंबून न असणे आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव या कारणांमुळे राज्याच्या अनेक भागांत सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाचा लवलेश या दोन जिल्ह्यांमध्ये जाणवत नाही. शहापूर व मुरबाडच्या टोकावडे परिसरात शेतीमाल घेऊन येणारे ट्रक अडवण्याचा प्रयत्न शुक्रवारी स्थानिक शेतकऱ्यांनी केला.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका असून त्यासाठी येणारा भाजीपाला, दूधपुरवठा नाशिक, नगर, पुणे आदी जिल्ह्यांतून होत आहे. या पुरवठ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकरी सक्षम नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत. जिल्ह्यातील ८२ टक्के म्हणजे एक लाख आठ हजार ८१२ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. पावसाळ्यात ते केवळ भाताचे उत्पन्न घेतात. स्थानिक बाजारपेठेतही त्यांचा भाजीपाला जात नाही.स्थानिक शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे उत्पादन काही महिने आधीच संपले आहे.
नागरिकीकरणाच्या रेट्यात शेतीखालची जमीन झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात केवळ ७७ हजार ६४४ हेक्टर शेती असून त्यावर एक लाख ३२ हजार शेतकऱ्यांची मालकी आहे. यापैकी एक लाख आठ हजार ८१२ शेतकरी अल्पभूधारक आहेत. केवळ १८ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. शेतीला लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी उत्पादन होत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून तो शेतीतून बाहेर पडत आहे. यापेक्षा मजुरी करणे त्याने स्वीकारले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खंबीर नेतृत्व नाही.


शेतकऱ्यांच्या संपाला ठाणे, पालघरमधून प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. खंबीर नेतृत्वाचा अभाव असून दुर्दैवाने शेतकरी संघटित नाही. मात्र, त्यांना कर्जमाफी हवीच आहे. बहुतांश शेतकरी थकबाकीदार आहेत. संपाला पाठिंबा देण्यासाठी लवकरच ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत
- राजेंद्र पाटील,
अध्यक्ष, टीडीसीसी बँक


एकूण १० एकरमध्ये १७ हजार केळींची बाग आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही केळी काढणे थांबवले आहे. सुमारे १०० शेतकऱ्यांचा एक गट ठाणे, पालघरमध्ये केळी उत्पादक आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही.
- निलेश भोईर, गांद्रे, वाडा


गुजरातमधून दूध आणणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, तसे झाल्यास ठाणे, पालघरमधील आइस्क्रीम पार्लर कुणबीसेना चालू देणार नाही. ७ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते माधव भांडारी यांना नांगर, बी-बियाणे भेट देऊन निषेध करणार आहे. यापुढे आम्ही फक्त घराला पुरेल तेवढेच अन्नधान्य पिकवणार आहे.
- प्रफुल्ल पाटील,
कुणबीसेना, जिल्हाप्रमुख


शहापूर तालुक्यात सध्या भाजीपाला व दुधाचे फारसे उत्पादन नाही. शहरात भाजीपाला जात नाही. काही शेतकरी दूध उत्पादक असले, तरी दोन ते पाच रुपयांचा नफा मिळवून विकतात. तालुक्यात कोठेही दूध उत्पादक सोसायट्या नाहीत. विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. शेतकरी गरीब आहे. या संपाला शेतकऱ्यांचा फारसा पाठिंबा दिसून येत नाही.
- राकेश वारघडे,
शाई शेतकरी संघर्ष समिती

Web Title: Remote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.