ई-वेस्ट प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:08 AM2019-07-23T01:08:59+5:302019-07-23T01:09:09+5:30

आर्थिक स्थिती योग्य नसल्याचे कारण : नगरसेवकांनी केली कारवाईची मागणी

Removal leg of contractor for E-Waste project | ई-वेस्ट प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा काढता पाय

ई-वेस्ट प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा काढता पाय

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ई-वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी रिस्पोज वेस्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च कंपनीने निविदा भरली होती. महापालिकेकडून या कंपनीला कामही दिले जाणार होते. मात्र, ऐनवेळी कंपनीने आर्थिक कारण देत प्रकल्प राबविण्यात स्वारस्य नाही, असे महापालिकेस कळविले आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने आयत्यावेळी शनिवारी महासभेत मंजुरीसाठी ठेवला असता सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.

रिस्पोज वेस्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च कंपनीने ई-वेस्टवर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली होती. कंपनीने ३०० चौरस फुटांची मोकळी जागा रिकव्हरी शेड व चार हजार चौरस मीटरची जागा प्रकल्पासाठी मागितली होती. महापालिकेने या कंपनीला हे काम देण्याचे ठरविले होते. मात्र, आर्थिक बळ नसल्याने कंपनीने आता कामात रस नसल्याचे कारण महापालिकेला दिले आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवारी महासभेत मांडला.

मात्र, कंपनीचे अन्य १५ ठिकाणी प्रकल्प सुरू असताना कंपनीने आर्थिक स्थिती योग्य नाही, असे ऐनवेळी सांगणे योग्य आहे का, असा प्रश्न स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला.

कंपनीला कामात स्वारस्य नसेल तर कंपनीने प्रशासनाचा वेळ वाया घालविला. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी प्रक्रिया राबविण्यात खर्च झाला आहे. महापालिका कचरा प्रकरणावरून आधीच अडचणीत आहे. त्यातच प्रशासनाने अशा प्रकारचा प्रस्ताव आयत्यावेळी सभेपुढे कसा व कशाच्या आधारे मांडला आहे. प्रशासन कंत्राटदार कंपनीला पाठीशी घालत आहे. कंपनीने महापालिकेचा वेळ वाया घालविला असल्याने कंपनीच्या विरोधात दंडात्मक रक्कम आकारावी. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी म्हात्रे यांनी महासभेत केली.

राज्यातील कोणत्याही महापालिका आपल्या हद्दीत ई वेस्ट प्रकल्प नाही. हा प्रकल्प सुरू झाला असता तर केडीएमसी ही राज्यातील ई वेस्ट प्रकल्प राबवणारी पहिली महापालिका ठरली असती. मात्र, कंत्राटदाराने पळ काढल्याने ई वेस्टसाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

दरम्यान, ई वेस्ट प्रकल्प राबवण्यासाठी २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून जुलै २०१९ पर्यंत केवळ कागदी घोडे नाचवण्यातच प्रशासनाने धन्यता मानली आहे. घनकचरा प्रकल्पही संथगतीने सुरू असल्याने महापालिकेस मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डेडलाइन दिली आहे.

घनकचरा प्रकल्पांप्रमाणे कोंडी
ई वेस्ट प्रकल्पासाठी ‘डोंबिवली व्हिजन २०२०’ मांडणारे डोंबिवलीतील डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी पुढाकार घेतला होता.
त्यासाठी त्यांनी ई वेस्ट गोळा करण्यासाठी मोहीम राबवली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊनही त्यातही महापालिकेने स्वारस्य दाखविले नाही. घनकचरा प्रकल्पांप्रमाणेच ई वेस्ट प्रकल्पाची ही कोंडीच झाली आहे.

Web Title: Removal leg of contractor for E-Waste project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.