गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्यांचे सरकारी नियमांचे विघ्न दूर करा अन्यथा...रेल रोको! कोकण रेल्वे प्रवाशी संघाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 03:33 PM2021-09-01T15:33:25+5:302021-09-01T15:34:25+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात राज्य सरकारने अटी व नियमांचे विघ्न आणल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
ठाणे,
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात राज्य सरकारने अटी व नियमांचे विघ्न आणल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याच्या अटीबद्दल कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने विरोध दर्शविला आहे. तसेच येत्या ५ सप्टेंबरपर्यत सरकारने गणेशभक्तांना नियमात मुभा न दिल्यास ६ सप्टेंबरला रेल रोको करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवाशी संघाने बुधवारी ठाण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत दिला आहे.
गणेशोत्सव म्हणजे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष सोहळा असतो. या पाश्र्वभूमीवर,कोकणात जाण्यासाठी कोकणवासीय सज्ज झाले आहेत. गतवर्षी कोरोनामुळे जाता आले नाही.त्यामुळे यंदा कोरोना काहीसा ओसरू लागल्यानंतर अनेकांनी तीन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण केले. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला कोकणात गावी जाता येणार अशा आनंदात असतानाच २३ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने नविन अटी व नियम लादले. कोकणात जाणाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र आणि लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक केल्याने कोकणवासीयांच्या आनंदावर पुन्हा विरजण पडले. तेव्हा,चाकरमान्यांच्या मार्गातील हे अडथळे दूर करावेत, या मागणीसाठी बुधवारी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. तसेच,येत्या ५ सप्टे.पर्यत नियम शिथिल न केल्यास ०६ सप्टेंबर रोजी रेल रोको करणार असल्याचे सांगितले.या पत्रकार परिषदेला कोकण रेल्वे प्रवाशी संघाचे पदाधिकारी राजु कांबळे, सुजित लोंढे,दर्शन कासले,संभाजी ताम्हणकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या बऱ्यापैकी कोरोना नियंत्रणात आहे.तेव्हा,यंदा तरी अटी नियमांमध्ये शिथिलता देऊन कोकणचा प्रवास सुरळीत करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवुन केली होती. मात्र,मुख्यमंत्री कार्यालयाने हे प्रकरण मदत व पुनर्वसन खात्याकडे वर्ग करून टोलवाटोलवी सुरु केल्याचा आरोपही कोकण रेल्वे प्रवाशी संघाने केला आहे.