५० वर्षांत दिलेल्या आरक्षणांची श्वेतपत्रिका काढा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:07 PM2018-11-28T23:07:22+5:302018-11-28T23:07:43+5:30
सरकारनं १९६७ पासून ते आजवर ज्या ज्या समाजांना आरक्षणं दिली, ती कशी दिली? याची माहिती श्वेतपत्रिका काढून द्यावी, अशी मागणी मराठा समाजानं केलीये.
डोंबिवली : सरकारनं १९६७ पासून ते आजवर ज्या ज्या समाजांना आरक्षणं दिली, ती कशी दिली? याची माहिती श्वेतपत्रिका काढून द्यावी, अशी मागणी मराठा समाजानं केलीये. आज डोंबिवलीत झालेल्या मराठा समाजाच्या मंथन मेळाव्यात ही मागणी करण्यात आली. मराठा समाजाला सरकार आरक्षण देण्याच्या नावाखाली केवळ झुलवत असून सरकारला यापुढे आम्ही माफ करणार नाही, अशी भूमिका मराठा समाजानं यावेळी घेतली.
सरकारनं २३ मार्च १९९४ रोजी साधा जीआर काढून १६ टक्के खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणाची वाढ केली होती. पण आता मराठा समाजाला आरक्षण द्यायची वेळ आल्यावर मात्र सरकार आम्हाला कोर्टाच्या चकरा मारायला लावतेय. जर त्यावेळी जीआर काढून आरक्षण देता आलं, तर आताही द्या, अन्यथा त्यावेळी दिलेलं आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिलं होतं का? हे कबूल करा, अशा शब्दात यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारवर हल्ला चढवला. तसंच १९६७ पासून ते आजवर सरकारनं जितकी आरक्षणं दिली, ती कशी दिली, याची माहिती श्वेतपत्रिका काढून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या मेळाव्याला मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सरोटे, पत्रकार आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील, ऍड प्रल्हाद भिल्लारे, समन्वयक अरविंद मोरे, लक्ष्मण मिसाळ यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.