अंबरनाथमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन काढल्या, चोरीच्या भीतीने यंत्रे धूळखात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:52 AM2019-06-24T02:52:25+5:302019-06-24T02:52:43+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक योजना शहरात राबवण्यात आल्या. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवण्यात आले.
अंबरनाथ - स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक योजना शहरात राबवण्यात आल्या. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवण्यात आले. गरीब आणि गरजू महिलांना त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी हे यंत्र त्या ठिकाणी बसवले होते. मात्र, बसवण्यात आलेली सर्व यंत्रे काढून पुन्हा पालिकेच्या आरोग्य विभागात जमा करण्यात आली आहे, याची प्रांजळ कबुली आरोग्य विभागाच्या निरीक्षकांनी पालिका सभागृहात दिली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर १२ सॅनिटरी नॅपकिन यंत्रे मागवली होती. ही यंत्रे शहरातील काही सार्वजनिक स्वच्छतागृहे, माध्यमिक शाळा आणि पालिकेच्या शाळेत बसवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रे स्वच्छतागृहांमध्ये दिसत नसल्याने यासंदर्भात नगरसेवकांनी पालिका सभागृहात त्याबाबत चर्चा केली. या चर्चेला उत्तर देताना आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रांजळ कबुली दिल्यामुळे नगरसेवकांची मानही शरमेने खाली गेली.
आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांच्या स्पष्टीकरणानुसार शहरातील स्वच्छतागृहात लावण्यात आलेले मशीन हे चोरीला जातील, या भीतीने काढून घेण्यात आले आहेत. स्वच्छता सर्वेक्षणासाठी निरीक्षक आल्यावर पुन्हा ते यंत्र स्वच्छतागृहात बसवले जाते.
हा दौरा झाल्यावर पुन्हा यंत्र काढून ते कार्यालयात जमा केले जाते. शहरातील स्वच्छतागृहांचे दरवाजेही चोरीला जात असल्याने ही यंत्रेही चोरीला जातील, या भीतीने सर्व यंत्रे कार्यालयात जमा केली जातात. हे उत्तर येताच नगरसेवकांनी सभागृहातच अधिकाऱ्यांना धारेवर धरत योजनांचा केवळ दिखावा न करण्याच्या सूचना दिल्या.
यंत्रे बसवण्याचे संबंधितांना दिले आदेश
पालिका कार्यालय, शाळा, रुग्णालयातील स्वच्छतागृहे आणि खाजगी शाळेतील स्वच्छतागृहांत ही यंत्रे बसवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नव्याने येणारी यंत्रेही तशाच पद्धतीने बसवावीत, अशी सूचना सभागृहात करण्यात आली.
केवळ स्पर्धेत टिकण्यासाठी योजना न आखता त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असेही सांगण्यात आले. तसेच कार्यालयात जमा असलेली सर्व यंत्रे ही सुरक्षाव्यवस्था असलेल्या इमारतीमधील महिलांच्या स्वच्छतागृहात बसवण्याचे आदेश दिले.