तलावातील गाळ काढल्याने पाणीसमस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:33 PM2019-06-20T23:33:41+5:302019-06-20T23:33:50+5:30
माहुली परिसरातील टंचाई दूर होणार; पाणी साठवण्याची क्षमता वाढणार
वासिंद : माहुली परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील दोन तलावांमधील २४,८६१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे काम नुकतेच करण्यात आले. यामुळे आता या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.
माहुली किल्ल्याच्या कुशीतील माहुली, आवाळे, चांदरोटी, मामणोली, कराडे या पाच महसुली गावांमध्ये आणि त्यातील १८ पाड्यांमध्ये यंदा टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. टँकरचे पाणी ओतता यावे, यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीद्वारे पाच हजार लीटर क्षमतेच्या दोन टाक्या दिल्या गेल्या. मात्र, मुळातच टँकरद्वारे पाणी द्यावे लागू नये, तसेच भूगर्भजल वाढावे, यासाठी या दोन तलावांतील गाळ काढण्याची मागणी माहुली ग्रामपंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीकडे केली होती. लोकांना तसेच जनावरांनाही पाणीटंचाई भेडसावते. प्राण्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू नयेत आणि त्यांना पिण्यास पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांनी हा प्रस्ताव कंपनीकडे मांडला. जेएसडब्ल्यू कंपनीचे पब्लिक रिलेशन आॅफिसर चिन्मय पालेकर यांनी हे काम कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) म्हणून हाती घेतल्याचे सांगितले.
उपसरपंच प्रदीप आगिवले यांनी या तलावाच्या पाझरामुळे परिसरातील विहिरींमध्ये उन्हाळ्यात पाणी टिकेल आणि तलावाच्या आसपास असलेल्या शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला. जेएसडब्ल्यू कंपनीने यापूर्वी कसारा येथील टोकरवाडी आणि वासिंदजवळील कातबाव तलावातील ३० हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी २४,८६१ क्युबिक मीटर गाळ काढून तलावांची धारणक्षमता ५४,८५१ क्युबिक मीटरने वाढवली आहे. शहापूर तालुक्यात पडणारा पाऊस अशा रीतीने अडवून जमिनीत जिरवल्यास तालुका टँकरमुक्त होण्यास निश्चितच मदत होईल.