कळवा-ऐरोली रेल्वेमार्गासह पनवेल स्थानकबाधितांना रेंटलची घरे; ३१९२ घरे राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 07:22 AM2020-08-29T07:22:12+5:302020-08-29T07:22:21+5:30

पुनर्वसनाचा अडथळा होणार दूर

Rental houses for Panvel station victims along Kalwa-Airoli railway line; 3192 houses reserved | कळवा-ऐरोली रेल्वेमार्गासह पनवेल स्थानकबाधितांना रेंटलची घरे; ३१९२ घरे राखीव

कळवा-ऐरोली रेल्वेमार्गासह पनवेल स्थानकबाधितांना रेंटलची घरे; ३१९२ घरे राखीव

Next

नारायण जाधव 

ठाणे : कल्याण-कर्जत-कसाऱ्याच्या प्रवाशांना ठाण्याला न येता लोकलने थेट नवी मुंबईत जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कळवा-ऐरोली या मार्गात बाधित होणाºया झोपडीधारकांसह पनवेल रेल्वे स्थानकाच्या विकासात अडथळा ठरणाºया झोपडीधारकांना आपल्या हिश्शाची रेंटलची घरे देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यामुळे दोन्हीप्रकल्पांतील बाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटून त्यांना गती मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

याबाबतच्या धोरणास एमएमआरडीएने आपल्या जुलै महिन्याच्या सभेत मंजुरी दिली आहे. यानुसार, कळवा-ऐरोली या मार्गातील बाधितांसाठी २१००, तर पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाधितांसाठी १०९२ घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांसाठी रेडीरेकनरप्रमाणे दर आकारण्यासही एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार कळवा-ऐरोली मार्गातील बाधितांना ठाण्यातच घरे मिळणार आहेत. सध्या यापैकी ठाणे महापालिकेकडे ९२४ घरे शिल्लक आहेत. पनवेल टर्मिनस बाधितांना पनवेलमध्येच सॅन्वो रिसॉर्टमधील १०९२ घरे सिडकोकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

प्रवाशांना मिळणार दिलासा
कळवा-ऐरोली रेल्वेमार्ग एमयूटीपी-३ मध्ये प्रस्तावित केला आहे. यात कळवा येथे मफतलाल कंपनीनजीक उन्नत रेल्वेमार्ग बांधून तो थेट ऐरोलीनजीक ठाणे-वाशी-पनवेल मार्गास जोडण्यात येणार आहे. यामुळे कल्याण-कर्जत-कसाºयाच्या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानक मार्गे नवी मुंबईत न जाता थेट यामार्गे जाता येणार आहे. यामुळे एकीकडे त्यांचा ठाण्याचा वळसा कमी होणार आहे, तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताणही कमी होणार आहे.

बाधितांसाठी त्याच महानगरात घरे
सध्या एमएमआरडीएच्या धोरणानुसार रेंटलच्या घरांपैकी ५० टक्के सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. मात्र, यापुढे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात ती देणे अशक्य आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यातही अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे त्यात बाधित होणाऱ्यांसाठी त्या शहरातच घरे देणे आवश्यक असल्याने रेंटलची घरेवाटपाच्या धोरणात एमएमआरडीएने बदल केला आहे.

गिरणी कामगारांच्या घरांचा ताबा म्हाडाकडे देणार
गिरणी कामगारांसाठीची घरे एमएमआरडीए आता म्हाडास हस्तांतरित करणार असून त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांसाठी त्यांची सोडत काढणे, प्रथम देकारपत्र देण्यापासून ते सदनिकांचा ताबा देण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हाडास करावी लागणार आहे. शिवाय, या घरांच्या देखभालीची जबाबदारीही म्हाडावर ढकलण्यात आली आहे.

Web Title: Rental houses for Panvel station victims along Kalwa-Airoli railway line; 3192 houses reserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे