पुलाच्या दुरुस्तीचे काम लष्कराकडे सोपवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:45 PM2019-05-27T23:45:18+5:302019-05-27T23:45:24+5:30
पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या.
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा आणि सत्ताधाऱ्यांचा चालढकलपणा यामुळे पुलाच्या दुरुस्तीकडे कानाडोळा होत आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल करून दुरुस्तीचे काम सैन्यदलाकडे देण्यात यावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
मनसेचे शहरप्रमुख राजेश कदम, जिल्हा संघटक हर्षद पाटील, गटनेते मंदार हळबे, प्रल्हाद म्हात्रे, युवा संघटक सागर जेधे, सुदेश चुडनाईक आदींनी सोमवारी डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सैन्यदलाला काम द्यावे, ही मागणी पुढे आली.
आपत्कालीन स्थितीमध्ये विशेष तरतूद या नियमान्वये तुम्ही टेंडर न काढता काम करण्याची आवश्यकता आहे, पण तसे झालेले नाही. टेंडर काढण्यात कोणाला स्वारस्य आहे, असा सवालही हळबे यांनी केला.
त्यामुळे आता मनसे स्टाइलने अधिकाºयांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. दोन दिवसांमध्ये कामासंदर्भात हालचाली न झाल्यास मनसे काय पवित्रा घेते, हेही स्पष्ट होणार असल्याचे प्रल्हाद म्हात्रे म्हणाले. ठाकुर्लीचा उड्डाणपूल हा पूर्ण क्षमतेचा नाही, तर त्याचे काम करतानाच तो चांगल्या क्षमतेचा का केला नाही, असा सवालही म्हात्रेंनी केला.
>‘जबाबदारी कोणाची?’
सध्या महापालिका महापौर विनीता राणे चालवत आहेत की, स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, असा सवाल हर्षद पाटील यांनी केला.उड्डाणपुलासंदर्भात २० मे रोजी रेल्वेने पालिकेला पत्र दिले. ते मिळाल्यापासून एक बैठक झाली. त्यातून गोंधळ आणखी वाढला आहे. त्यामुळे याबाबत जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.