डोंबिवलीतील पादचारी पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने, पादचाऱ्यांना त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:02 AM2019-05-08T01:02:11+5:302019-05-08T01:03:31+5:30
डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची दुरुस्ती महिनाभरापासून सुरू आहे. हा पूल बंद असल्यामुळे मधल्या पादचारी पुलावरून प्रवाशांना येजा करावी लागत आहे.
डोंबिवली - डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची दुरुस्ती महिनाभरापासून सुरू आहे. हा पूल बंद असल्यामुळे मधल्या पादचारी पुलावरून प्रवाशांना येजा करावी लागत आहे. पूल तोडण्याचे काम कूर्मगतीने सुरू असून प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे हे काम वेगाने करण्याची मागणी उपनगरीय प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
ठाणे स्थानकातील पादचारी पूलही दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचेही काम सुरू नाही, त्यामुळे पावसाळ्याआधी हे दोन्ही पूल तयार होणे अशक्य आहे. प्रवाशांना पावसाळ्यात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे स्थानकात प्रवाशांना पुलाचे अन्य पर्याय आहेत, पण त्या तुलनेने डोंबिवलीत पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधीच नवा पूल तयार करून त्यानंतर जुना पूल तोडणे अपेक्षित होते.
पण, थेट पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे समस्येत वाढ झाली आहे. सध्या डोंबिवली स्थानकात दोन पादचारी पूल असल्याने त्या पुलांवरूनच लाखो प्रवासी येत असतात. त्यामुळे समस्येमध्ये वाढ होत आहे. त्या पुलाची रुंदी ४.५ मीटरवरून सहा मीटर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कोणतेही बदल आतापर्यंत झालेले नाहीत. त्यामुळे त्याची रुंदी वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भविष्यातील गर्दीचे लोंढे बघता पुलाची रुंदी वाढवणे आवश्यक आहे.
पुलाचे काम किती वेळात व्हावे, याचे कुठलेही नियोजन रेल्वे प्रशासनाकडे नाही. त्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर कोणताही विभाग त्याची माहिती देत नाही. त्यामुळे जेव्हा प्रवासी संघटनांना यासंदर्भात माहिती विचारतात, त्यावेळी आम्ही नेमके काय सांगायचे? स्थानिक रेल्वे प्रशासनही यासंदर्भात माहिती देत नाही. त्यामुळे प्रवाशांनी विचारायचे तरी कोणाला, असा सवाल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केला. रेल्वे प्रशासन आणि प्रत्यक्ष काम करणाºया कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे निदर्शनास येते, त्याचा फटका प्रवाशांना बसतो.
रेल्वे प्रशासनाने जूनपर्यंत काम करणार, असे म्हटले असेल, तर आणखी ६० दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे त्या कालावधीत निश्चितच काम झपाट्याने होईल. अभियंता विभागाचे त्यासंदर्भात नियोजन असेल.
- ए.के. जैन,
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी,
मध्य रेल्वे