रस्ते दुरुस्त करा, अन्यथा हारतुरे आंदोलन; मनसेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:21+5:302021-09-19T04:41:21+5:30
भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या दयनीय अवस्थेकडे मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने, मनसे कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष मनोज ...
भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या दयनीय अवस्थेकडे मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने, मनसे कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांची शुक्रवारी भेट घेतली. लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करा, अन्यथा मनसेच्या वतीने हारतुरे देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गुळवी यांनी दिला.
भिवंडी शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. विविध ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, बुजविलेले खड्डे दुसऱ्याच दिवशी उखडतात. रस्ते बुजविण्याकरिता वापरलेले साहित्य अतिनिकृष्ट असते. रस्ते बनविताना गुणवत्ता चाचणी करण्यासाठी मनपाकडून नेमले जाणारे अभियंते दुर्लक्ष करतात. अशा बेजबाबदार अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली. वेळीच कारवाई केली नाही, तर मनसे टाळ-मृदुंग, हार-फुलांनी पालिका प्रशासनाचे स्वागत करून आंदोलन छेडेल, असा इशारा गुळवी यांनी दिला. यावेळी मनसेचे उपशहराध्यक्ष प्रवीण देवकर, सिद्धार्थ खाने, योगेश धुळे, वाहतूक संघटक फिरोज शेख, महेश धुमाळ, विभाग अध्यक्ष विशाल कांबळे, जनार्दन राहुलवार, संतोष गंगळवार, शिवाजी लोमटे, सचिन तरे, असलम शेख, फकीर शेख, सुनीता गुप्ता, सना शेख, सहसचिव सुनील नाईक, आकाश दिनकर आदी उपस्थित होते.
..........