काटई रेल्वे उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम 10 दिवसात पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:49 PM2020-06-29T15:49:41+5:302020-06-29T15:50:00+5:30
खासदारांनी केली कामाची पाहणी
कल्याण: कल्याण शीळ मार्गावरील काटई रेल्वे उड्डाणपूल हा 15 जूनपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पूलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या पूलाच्या दुरुस्तीचे काम येत्या दहा दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
रेल्वे अधिकारी व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमावेत खासदार शिंदे यांनी काटई पूलाच्या दुरुस्तीची आज सकाळी पाहणी केली. दुरुस्ती केल्यावर या पूलावर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवणो शक्य होणा आहे. अवजड वाहनांची वाहतूक खोणी तळोजा मार्गे पनवेलकडे वळविण्यात येईल. काटई रेल्वे उड्डाण पूल हा कल्याण शीळ मार्गावर असून त्याच्या खालून दिवा पनवेल ही रेल्वे लाईन जाते. हा पूल वाहतूकीसाठी धोकादाययक असल्याने 15 जूनपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.
आयआयटीचीच्या अहवालानंतर पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. शीळ फाटामार्गे ठाणो, नवी मुंबई, पनवेल, पुणो परिसरात जाणाऱ्यांना पूल बंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्यांना या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने पूलावरील दहा टनाचा डेडलोड काढण्याचे काम केले आहे. उद्यापासून रेल्वेच्या अंतर्गत येणारे पूलाचे काम केले जाणार आहे. पूलाच्या चार गर्डरपैकी दोन गर्डरच्या बळकटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. दुरुस्तीनंतर पूल वाहतूकीसाठी किती ताण घेतो याची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर पूलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरु केली जाणार आहे.