२६ जुलैचीच पुनरावृत्ती; घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 12:30 AM2019-07-28T00:30:43+5:302019-07-28T00:31:01+5:30

काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी खाली उतरणेही कठीण झाले होते.

 Repeats July 1st; Water infiltrates into homes, disrupts lives | २६ जुलैचीच पुनरावृत्ती; घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

२६ जुलैचीच पुनरावृत्ती; घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

Next

ठाणे / बदलापूर : दीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारपासून जोरदार हजेरी लावली आणि शनिवारी आपले रौद्र रूप दाखवून यंत्रणांबरोबरच नागरिकांच्या मनामध्ये धडकी भरली. बदलापूरसहठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अंबरनाथ शहरांतील अनेक भागांत तुफान पाणी साचले आहे. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी खाली उतरणेही कठीण झाले होते. बदलापूरमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आल्याने २६ जुलैचीच पुनरावृत्ती झाल्याची भावना सामान्यांकडून व्यक्त झाली. तब्बल १४ वर्षांनंतर त्या जलप्रकोपाच्या आठवणी ताज्या झाल्याने अनेकांच्या छातीत धस्स झाले. पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराच्या जवानांना बोलवण्यात आले होते.
हवामान खात्याने २६ जुलै जवळ आल्याने जोरदार वृष्टीचा इशारा दिला होता. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पावसाने हे भाकीत खरे करून दाखवले. पावसाचा जोर वाढल्याने उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठली. नदीकिनाऱ्यावरील सर्व गावे पाण्याखाली आली. महापुराचा फटका हा कोल्हापूरला जाणाºया महालक्ष्मी एक्स्प्रेसला बसल्याने सर्व यंत्रणेचे लक्ष तेथे होते. मात्र, दुसरीकडे बदलापूर शहरात परिस्थिती हाताबाहेर गेली होती. हेंद्रेपाडा भागात १० फुटांपेक्षा जास्त पाणी आल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता. नदीपात्रापासून २५० ते ३०० मीटरपर्यंत पाण्याचा प्रवाह असल्याने या भागातील नागरिकांना आपले तळमजल्यावरील घरे सोडून पहिल्या मजल्यावर राहावे लागले.
२००५ च्या महापुराचा अनुभव घेतलेल्या बदलापूरमध्ये नव्या इमारतींना चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्याचे समोर आले. अनेक इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेमध्ये फ्लॅट तयार करून दिल्याने ती सर्व घरे पाण्याखाली गेली आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून नागरिक पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. मात्र, परिस्थिती गंभीर झाल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली. मांजर्ली परिसरातील नव्या इमारतींना पुराचा फटका बसला. वालिवलीत नव्याने तयार झालेल्या इमारती पाण्याखाली होत्या. वालिवली गाव ते एरंजाड गावादरम्यान असलेला उल्हास नदीवरील पूलही भरून वाहत होता. बंगले पाण्याखाली गेले होते.

धरणे काठोकाठ, मात्र घरात निर्जळी
कल्याण : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यात बहुतांश धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शहरांच्या पाण्याची चिंता मिटली असतानाच कल्याण-डोंबिवलीत मात्र नागरिकांना भरपावसात निर्जळीचा सामना करावा लागत आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने येथील पंपहाउसची यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर, घर पाण्यात; मात्र घरात पाणी नाही, अशी वेळ कल्याण-डोंबिवलीकरांवर ओढवली आहे. यामुळे रविवारीही पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांना शुक्रवारपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्याचा फटका जलशुद्धीकरण केंद्रांना बसला आहे. मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आठ फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे पंपहाउसच्या यंत्रणेत पाणी जाऊ न ही यंत्रणाच बंद पडली होती. त्यामुळे शनिवारी पहाटेपासूनच कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली पूर्व-पश्चिमेतील पाणीपुरवठा बंद होता. मोहिली केंद्रातून नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेऊ न तेथून ते वितरित करण्यात येते.
मात्र, हे जलशुद्धीकरण केंद्रही पाणी शिरल्याने ठप्प झाले होते. याशिवाय मोहने आणि बारावे या केंद्रांतही पाणी साचल्याने तेथील वीजपुरवठाच बंद करण्यात आला होता. यामुळे दोन्ही शहरांची पहाटेपासूनच पाणीकोंडी झाली होती. रविवारीही या केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या केंद्रांमधील पाणी ओसरल्यानंतर सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करण्यात येतील, अशी माहिती केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली.

दीड लाख ग्राहक अंधारात
डोंबिवली : सतत पडणाºया पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली आहेत. विविध विभागांत असलेल्या रोहित्रांमध्ये पाणी शिरून कोणती दुर्घटना होऊ नये, याची खबरदारी म्हणून महावितरणने विविध विभागांतील ४५२ रोहित्रे बंद ठेवली जाणार आहेत.
त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील एक लाख ३५ हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागणार आहे. पाऊस ओसरल्यानंतर ही रोहित्रे सुरू करण्यात येणार आहेत.
कल्याण पश्चिम २८ रोहित्रे, रेतीबंदर १५, मोहने १४, सर्वोदय परिसर ८, विठ्ठलवाडी ८, बदलापूर आणि परिसर १८५, म्हारळ, वरप परिसर ५९, टिटवाळा परिसर १४५ रोहित्रे बंद करण्यात आली आहेत, असे महावितरणचे उपमुख्य जनसंपर्कअधिकारी विश्वजित भोसले यांनी सांगितले.

भिवंडी पालिकेकडून दुर्लक्ष
भिवंडी : कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकिनारी असलेली घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. म्हाडा कॉलनी, ईदगाह रोड, बंदर मोहल्ला, तीनबत्ती, सौदागर मोहल्ला, नदीनाका या ठिकाणी शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने जीव मुठीत धरूनच राहण्याची वेळ आली आहे.

पाणी साचल्याने रात्रभर राहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. दुपारपर्यंत तरी या रहिवाशांच्या मदतीसाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतेही मदतकार्य पोहोचले नसल्याने नागरिक प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत होते.

सर्वत्र पाणी साचल्याने या भागातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. ज्या नागरिकांची घरे दुमजली आहेत, त्यांनी आपले स्थलांतर पहिल्या मजल्यावर केले असून ज्यांची घरे पाण्याखाली आली आहेत, अशा रहिवाशांनी बाजूला असलेल्या मदरशाचा आधार घेतला आहे.

खाण्यापिण्याची व्यवस्था पालिका प्रशासनाने केली असल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख ईश्वर आडेप यांनी दिली आहे. नालेसफाईअभावी शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती अशा भागांत पाणी साचल्यामुळे व्यापारी व घरगुती रहिवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. तर, निजामपूर पोलीस चौकीत पाणी शिरले आहे.

कल्याण रोड, अंजूरफाटा, माणकोली, रांजणोली बायपासनाका, वंजारपाटीनाका, नारपोली व शेलार अशा विविध मार्गांवरील वाहतूकव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तर, भिवंडी-वाडा मार्गावर नदीनाका परिसरात पाणीचपाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Web Title:  Repeats July 1st; Water infiltrates into homes, disrupts lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.