म्हसेंच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:46 AM2018-02-22T00:46:10+5:302018-02-22T00:46:13+5:30
भिवंडी महापालिकेच्या अठरा नगरसेवकांच्याविरोधात चौकशी तसेच पालिका क्षेत्रात प्रभावीपणे कर वसुली, बेकायदा बांधकामांवर कारवाई, मेट्रो रेल्वे प्रकल्प व स्वच्छ भारत अभियान आयुक्त डॉ. योगेश म्हसे प्रभावीपणे राबवत आहेत.
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या अठरा नगरसेवकांच्याविरोधात चौकशी तसेच पालिका क्षेत्रात प्रभावीपणे कर वसुली, बेकायदा बांधकामांवर कारवाई, मेट्रो रेल्वे प्रकल्प व स्वच्छ भारत अभियान आयुक्त डॉ. योगेश म्हसे प्रभावीपणे राबवत आहेत. मात्र आयुक्तांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे नगरसेवक, राजकीय मंडळी दुखावल्याने त्यांनी आयुक्तांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. सामान्य नागरिकांनी मात्र नेत्यांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.
मागीलवर्षी डॉ. योगेश म्हसे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी पालिकेच्या तिजोरीत केवळ १८ लाख होते. त्यामुळे पालिका कामगारांचे पगार थकले होते. पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आयुक्तांनी कर वसुलीचा आढावा घेतला असता मोठे व्यावसायिक व नागरिकांनी मालमत्ता कर थकवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी कर चुकवेगिरी करणाºयांकडून कराची वसुली सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बहुसंख्य नगरसेवक व नेते दुखावले गेले. करवसुलीबाबत अनेकांनी हस्तक्षेप केला मात्र राजकीय दबावाला बळी न पडता आयुक्त म्हसे यांनी सुमारे ५० कोटीची करवसुली करून आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर कामचुकार व गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर बदलीचा व निलंबनाचा बडगा उगारल्याने पालिकेतील टॉपटेन नगरसेवकांचे नातेवाईक व हस्तक भरडले गेले. तसेच मेट्रो रेल्वे व शहराच्या विकास आराखड्यानुसार आयुक्तांनी रस्तारूंदीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे काही राजकीय नेते दुखावले गेले. त्यांनी हा राग मनात ठेऊन अनेकांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडून आयुक्तांच्या बदलीची मोहीम सुरू केली. याच दरम्यान पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार वेळेत कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यांची कागदपत्रे आयोगाने आयुक्तांमार्फत मागवली आहेत.