सहायक नगररचनाकार तोडणकरांची बदली
By admin | Published: May 1, 2017 06:03 AM2017-05-01T06:03:27+5:302017-05-01T06:03:27+5:30
मागील दहा वर्षापासून बदलापूर पालिकेत सहायक नगररचनाकारपदी कार्यरत असूनही पुन्हा त्याच पालिकेत प्रतिनियुक्तीवर
बदलापूर: मागील दहा वर्षापासून बदलापूर पालिकेत सहायक नगररचनाकारपदी कार्यरत असूनही पुन्हा त्याच पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांची सरकारने अखेर बदली केली आहे. त्यांची अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील नगररचना योजनेच्या कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्या हा नवीन विषय नाही. मात्र एकच अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहतो. त्या अधिकाऱ्याची बदली अन्य ठिकाणी होऊनही ते बदलीच्या ठिकाणी न जाता सलग काही वर्षे अनुपस्थित राहून पुन्हा तो त्याच ठिकाणी प्रतिनियुक्ती मिळवतो. असाच काहीसा प्रकार बदलापूर पालिकेत घडला होता. बदलापूर नगर पालिकेत दहा वर्षापासून सहायक रचनाकारपदी असलेले तोडणकर यांना गेल्यावर्षी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही घटनांमुळे तोडणकर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. बदलापूर पालिकेत कार्यरत असताना पनवेल येथे बदली होऊनही तोडणकर यांनी तब्येतीचे कारण देत नियुक्ती स्वीकारली नाही. त्याचप्रमाणे सलग दोन वर्षे विनापरवानगी रजेवर असल्याकारणाने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश नगररचनाच्या सहसंचालकांनी दिले होते. पूर्वसूचना न देता हजर न राहिल्याने कारवाईचे आदेशही दिले होते. (प्रतिनिधी)
राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई
सरकारने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील कार्यालयात रु जू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यावेळी राजकीय दबावाने बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर पालिकेत सर्वाधिक काळ सहायक नगररचनाकार म्हणून काम केल्याने ते नेहमीच चर्चेत राहिले होते.