‘त्या’ अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:53+5:302021-09-14T04:46:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राबोडीतील खत्री इमारत दुर्घटनेनंतर आता ठामपावर टीकेची झोड उठू लागली आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राबोडीतील खत्री इमारत दुर्घटनेनंतर आता ठामपावर टीकेची झोड उठू लागली आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही या दुर्घटनेला ठामपा अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या व त्या काळात बेकायदा बांधकामाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
केवळ धोकादायक म्हणून वारंवार नोटीस बजावली होती म्हणून ठामपा जबाबदारी झटकू शकत नाही. वेळोवेळी कारवाई का केली नाही, असा सवालही काँग्रेसने केला आहे. ठामपा अस्तित्वात आल्यापासून शहरात बेकायदा बांधकामांचे पेव सुटले होते. त्यावर सातत्याने सर्वच पक्ष आवाज उचलत असतानाही ३० वर्षांत शेकडो इमारती उभ्या राहिल्या. तत्कालीन अधिकारी, याकडे बिल्डरांकडून फुटामागे व्यवहार करून थातूरमातूर कारवाई करीत होते. काही काळातच ही इमारत पूर्णपणे उभी राहते व विषय संपवला जात होता. आजही ठाण्यात हजारो निकृष्ट बेकायदा इमारती उभ्या आहेत, याला तत्कालीन अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
खत्री मॅन्शन उभी राहात असताना कोण कोण अधिकारी याला अभय देत होते? हे शोधून काढा व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
----------------