कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीने बाळंतिणीचा मृत्यू; नातेवाइकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:12 AM2019-12-29T00:12:22+5:302019-12-29T00:12:25+5:30
दाखल करण्यापूर्वीच प्रकृती नाजूक असल्याचा रुग्णालयाचा दावा
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वागळे इस्टेट, ज्ञानेश्वरनगर येथील २२ वर्षीय वनीता बाविस्कर या बाळंतिणीचा शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टरांना जाब विचारून गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले असून वनीता हिची प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नाजूक असल्याची पूर्वकल्पना तिच्या नातेवाइकांना दिल्याचे सांगितले.
ठाण्यातील ज्ञानेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या वनीता हिला गुरुवारी कळव्यातील रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. तत्पूर्वी त्यांना एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. शुक्रवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. जन्माला आलेले बाळ हे केवळ आठ महिन्यांचे असल्याने व पूर्ण वाढ न झाल्याने त्याला कळवा येथील एका खाजगी रु ग्णालयात काचपेटीत ठेवण्यात आले. वनीता यांची प्रकृती प्रसूतीच्यावेळी चांगली होती. तिचे पती व वडील घरी गेल्यावर शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक तिची प्रकृती खालावली व वनीताचे निधन झाले. फोनवरून तिच्या नातेवाइकांना रु ग्णालय प्रशासनाने ही वार्ता दिली. तातडीने नातेवाइकांनी कळवा रु ग्णालयात धाव घेतली व डॉक्टरांना जाब विचारत गोंधळ घातला. वनीतावर उपचार करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
वनीता बाविस्कर हिची प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गंभीर होती, याची कल्पना तिच्या नातेवाइकांना दिली होती. तसेच तिला लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून रुग्णालयात दाखल केले होते. त्यातच, जोखमीची प्रसूती असल्याने वरिष्ठ डॉक्टरांनी तिची तपासणी केली होती. यामध्ये डॉक्टरांकडून कोणतीही हलगर्जी झालेली नाही.
- डॉ. संध्या खडसे, डीन, कळवा, रुग्णालय, ठामपा