कंत्राटदाराला पाठीशी घालण्याकरिता केळकर समितीचा अहवाल गुंडाळला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:18+5:302021-06-17T04:27:18+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात अभिनेत्री मीरा चोप्रा हिला बनावट ओळखपत्राआधारे लस दिल्याबाबत चौकशीसाठी नियुक्त ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात अभिनेत्री मीरा चोप्रा हिला बनावट ओळखपत्राआधारे लस दिल्याबाबत चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या समितीचा अहवाल महापालिकेने गुंडाळला असल्याचे समजते. केळकर समितीचे निष्कर्ष जाहीर करण्यापूर्वीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणखी एका चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. या प्रकाराला भाजपने आक्षेप घेतला असून, २१ बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या ओम साई आरोग्य केअर प्रा. लि., या कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला. दोषी कंत्राटदाराला वाचविण्यासाठी कोणाच्या इशाऱ्यावरून महापालिका यंत्रणा हलत आहे, असा सवालही भाजपने केला.
महापालिकेच्या पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमध्ये पात्र नसतानाही अभिनेत्री मीरा चोप्रा हिला लस दिल्याचे उघड झाले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी चौकशी करण्यासाठी उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने केलेल्या चौकशीत कंत्राटदार मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि.,ने तब्बल २१ बनावट ओळखपत्रे तयार केल्याचे आढळले. त्यात एका अभिनेत्रीलाही ॲडमीन विभागात कार्यरत असल्याचे भासवण्यात आले होते. संबंधित कंत्राटदाराने बनावट ओळखपत्रांचा वापर करून महापालिकेची फसवणूक व आर्थिक लूट केल्याचे निष्पन्न झाले होते. केळकर समितीपुढे कंत्राटदार वा कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने चौकशीसाठी हजेरीही लावली नव्हती. केळकर समितीने संबंधित कंत्राटदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केल्याचे समजते. मात्र, महापालिका प्रशासनाने संबंधित अहवाल जाहीर न करता सोयीस्कर मौन बाळगले, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. आयुक्त शर्मा यांना कारवाई करण्यास अडचण काय, असा सवालही त्यांनी केला.
आता महापालिकेने उपायुक्त मनीष जोशी यांच्या नेतृत्वाखाली नवी समिती नेमली आहे. या समितीकडून आता लसीकरणातील गैरप्रकारांबाबत अहवाल तयार करवून घेतला जाणार आहे. या प्रकाराला डावखरे यांनी आक्षेप घेतला. केळकर समितीचा अहवाल जाहीर न करताच का फेटाळण्यात आला? केळकर समितीने कोणत्या शिफारशी केल्या? संबंधित अहवाल चुकीचा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे? का? कंत्राटदार मे. ओम साई आरोग्य केअर प्रा. लि., कंपनीला पाठीशी का घातले जात आहे? नव्या जोशी समितीची आवश्यकता का भासली? असे सवाल डावखरे यांनी केले.
.................
कंत्राटदार कुणाचा जावई
ओम साई हा कंत्राटदार कुणाचा जावई आहे का? ग्लोबल कोविड व पार्किंग प्लाझा हॉस्पिटलचे व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीकडून अनेक गैरप्रकार झाले आहेत. रुग्णांना मोफत सेवा असताना तब्बल लाख- दीड लाख रुपये उकळून व्हेंटिलेटर बेडवर रुग्णाला दाखल करणे, प्लाझा हॉस्पिटलमधील १६ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी, नर्सचे पगार न देणे आदी तक्रारी आहेत. केळकर समितीपुढे चौकशीसाठी हजेरी लावण्यास कंत्राटदार फिरकला नाही. हा कंत्राटदार कोणाच्या जिवावर एवढी मुजोरी दाखवत आहे.
- निरंजन डावखरे, आमदार व जिल्हाध्यक्ष, भाजप
.........
वाचली