कळव्यातून गहू, तांदळाचा बेकायदेशीर साठा जप्त
By Admin | Published: June 3, 2017 04:13 AM2017-06-03T04:13:05+5:302017-06-03T04:13:05+5:30
शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले ४९८ किलो तांदूळ, तर ३५१९ किलो गहू असा ९६ हजार १८४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रमेश चौधरी या व्यापाऱ्यास अटक केली आहे, तर विश्वनाथ करलाद हा फरार आहे.
ठाण्याचे शिधावाटप अधिकारी राजू पळसकर यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास मनीषानगर, कळवा येथील ४१ फ २२० या शिधावाटप दुकानात अचानक तपासणी केली असता, ही बाब उघड झाली. याशिवाय, १८ मे पासूनची केरोसीनची विक्री, तसेच इतर अन्नधान्याची विक्री आणि साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. विश्वनाथ करलाद यांच्या या दुकानात अन्नसुरक्षा परवाना, नोंदवही नव्हती, तसेच साठेपुस्तकातही खाडाखोड आढळली. अन्नधान्याचा साठा उपलब्ध बिलांप्रमाणे नव्हता. असे अनेक गैरप्रकार आढळल्यामुळे गहू आणि तांदळाच्या साठ्यासह ९६ हजारांचा ऐवज १ जून रोजी पहाटे २ पर्यंत चाललेल्या कारवाईत जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.