कळवा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच अडचणीत,आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 04:20 PM2020-05-07T16:20:24+5:302020-05-07T16:21:45+5:30
रुग्णांवर उपचार करता करता आणि रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच अडचणीत येत असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाणे : कोरोनाचा संसर्ग ठाणे शहरात दिवसागणिक वाढत आहे. दुसरीकडे आता ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता तिच्या दोन मुलींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या रुग्णालयात आणखी एका रुग्णाचा मृत्यु झाला असून त्याचा मृतदेह रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. परंतु यावेळेस मात्र पूर्ण काळजी घेतल्याचे दिसून आले आहे. परंतु आता कळवा रुग्णालयातील एक एक करुन आतापर्यंत चार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच अडचणीत आल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी एका वैद्यकीय कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आणखी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या दोन मुलींसह एका वैद्यकीय अधिकाऱ्याचाही रिर्पोट पॉझीटीव्ह आला आहे. तर त्यांच्या संपर्कातील इतर काही वैद्यकीय अधिकाऱ्याच्याही आता चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालय कोव्हीडसाठी सज्ज केल्यानंतर तेथील रुग्ण हे कळवा हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. परंतु आता कळवा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यानाच कोरोनाची लागण होत असल्याने संपूर्ण रुग्णालय अडचणीत आले आहे. दुसरीकडे या रुग्णालयात आणखी एका रुग्णाचा मृत्यु बुधवारी झाला असून त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. यावेळेस मात्र रुग्णालयाने पूर्णपणे नियमानुसार काम केले आहे. परंतु असे जरी असले तरी सदरचा रुग्ण हा सुरवातीला आयसीयुमध्ये दाखल होता. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे आता आयसीयुमधील कर्मचारी वर्ग आणि तेथील रुग्णांच्या अडचणीतही भर पडली आहे. तसेच रुग्णालयाच्या डिन कडून झालेल्या ढिसाळ कारभारानंतर त्यांच्याकडून अधिकार काढून घेण्यात आले आहेत.
दरम्यान कळवा भागातील आरोग्य केंद्रातील एका महिला वैद्यकीय कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्यानाच जर अशा प्रकारे कोरोनाची लागण होत असले तर रुग्णांवर उपचार कोण करणार असा सवालही आता उपस्थित झाला आहे.