रिपब्लिकन नेत्यांमुळेच रिपाइंची वाताहत - संसारे
By admin | Published: November 16, 2015 02:05 AM2015-11-16T02:05:18+5:302015-11-16T02:05:18+5:30
प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि रा.सू. गवई या रिपब्लिकन नेत्यांमुळेच रिपब्लिकन पक्ष गल्लीबोळातला पक्ष झाला आहे,
ठाणे : प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि रा.सू. गवई या रिपब्लिकन नेत्यांमुळेच रिपब्लिकन पक्ष गल्लीबोळातला पक्ष झाला आहे, असा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला. रामदास आठवले यांची भाजपासोबत युती असूनही त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. ज्या विचारधारेला बाबासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला, त्याच विचारांसोबत आठवलेंनी घरोबा केला, ही त्यांची घोडचूक असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
पक्ष कार्यकर्ता मेळाव्यासाठी संसारे ठाण्यात आले होते. या वेळी रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय महासचिव निशिकांत दासूद, भारिप बहुजन महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळाराम जाधव, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप मित्रा, रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजा चव्हाण, रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष भोला मंडल, रिपब्लिकन सेनेचे ठाणे शहराध्यक्ष सुनील कडाळे आदी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांसह विविध गटांतील शेकडो कार्यकर्त्यांनी संसारे यांचे नेतृत्व स्वीकारले.
ज्या नेत्यांनी सरकारने मंजूर केलेल्या इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उंचीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विविध कारणांनी विरोध केला, तेच नेते पंतप्रधान मोदींसोबत भूमिपूजन करायला पुढे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. तर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे ४२ नगरसेवक निवडून आले. त्याच ठिकाणी या पक्षात युती असलेल्या रामदास आठवले यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही. यावरून तरी आठवले यांनी बोध घ्यावा. भाजपासोबत जाऊन घोडचूक केली, हे कबूल करावे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)