रिपब्लिकन पक्षाला एका जातीपुरता सिमीत ठेवणार नाही; रामदास आठवले यांची प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 10:46 PM2021-10-03T22:46:02+5:302021-10-03T22:46:28+5:30
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाला. मात्र पक्षातील गटतटाच्या राजकारणामुळे पक्ष प्रभावहीन झाला असून एका जातीपुरता सीमित झाला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : डॉ बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष एका जातीपुरता व गटातटात विभागल्याने प्रभावहीन झाला. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षाला एका जातीपुरता सिमीत न करण्याची प्रतिज्ञा रिजेन्सी अंटेलिया हॉल मध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या ६४ व्या वर्धापनदिनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाला. मात्र पक्षातील गटतटाच्या राजकारणामुळे पक्ष प्रभावहीन झाला असून एका जातीपुरता सीमित झाला. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्ष एका जाती पुरता सीमित ठेवला जाणार नसल्याची प्रतिज्ञा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या ६४ व्या वर्धापनदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिजेन्सी अंटेलिया हॉल मध्ये केली. रिपब्लिकन पक्षाची येणाऱ्या महापालिकेसह अन्य निवडणुकीत भाजप सोबत युती राहणार असल्याचे यावेळी आठवले यांनी स्पष्ट केले. सबका साथ, सबका विकास या तत्वावर देश प्रगतीच्या शिखरावर नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे खरे कैवारी बनल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे तीन पक्षाचे तीन तिगाडी सरकार केंव्हाही जाण्याचे संकेत दिले.
राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइं यांची भविष्यात युती झालेली दिसेल. तसेच राज्यातील रस्ते खड्डयात गेले नसून राज्य सरकार खड्डयात गेल्याचे ते म्हणाले. महिला व दलितांवर अत्याचार वाढल्याची टीकाही त्यांनी केली. डोंबिवलीतील पीडित मुलीसह कुटुंबाची भेट घेऊन पक्षाच्या वतीने कुटुंबाला १ लाखाची मदत देऊन, मुख्यमंत्री यांनीं २० लाखाची मदत द्या. अशी मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले. शेतकऱ्याच्या फायद्याचे कायदे मोदी सरकारने केले असून त्यामध्ये विरोधक राजकारण आणत असल्याची टीका यावेळी केली. यावेळी केंद्रीयमंत्री कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी, पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव, अण्णा रोखडे, राजेश वाधारीया, महेश सुखरामानी यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पक्षाच्या वर्धापनदिना निमित्त कार्यकर्त्यांना साकडे
शहरातील रिजेन्सी अंटेलिया येथील खुल्या सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या वर्धापनदिन कार्यकर्त्यानी एकच गर्दी केली होती. पक्षाला उभारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केंद्रीयमंत्री व पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी केले.