रिपब्लिकन पक्षातील गटबाजी चव्हाटयावर, एकीकडे युवक आघाडीचा मेळावा तर दुसरीकडे बॅनरला फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 09:14 PM2017-09-25T21:14:05+5:302017-09-25T21:14:39+5:30
रिपब्लिकन पक्षातील गटबाजी काही नवीन नाही परंतू रविवारी कल्याण डोंबिवली रिपब्लिकन युवक आघाडी कार्यकर्ता मेळावा पुर्वेकडील परिसरात पार पडत असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागामध्ये या मेळावाच्या कार्यक्रमाच्या बॅनरला काळे फासले गेल्याने पक्षातील गटबाजी चव्हाटयावर आली आहे.
डोंबिवली, दि. २५ - रिपब्लिकन पक्षातील गटबाजी काही नवीन नाही परंतू रविवारी कल्याण डोंबिवली रिपब्लिकन युवक आघाडी कार्यकर्ता मेळावा पुर्वेकडील परिसरात पार पडत असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागामध्ये या मेळावाच्या कार्यक्रमाच्या बॅनरला काळे फासले गेल्याने पक्षातील गटबाजी चव्हाटयावर आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या कार्यकत्र्यानी हे कृत्य केल्याचा आरोप युवक आघाडीचे सल्लागार माणिक उघडे यांनी केला आहे तर बॅनरवर पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र इतर मान्यवरांच्या मानाने छोटया आकाराचे लावल्याने कार्यकत्र्याच्या भावना उफाळल्या आणि यातुन हे कृत्य घडल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी लोकमतकडे व्यक्त केली. छापण्यात आलेल्या बॅनरबाबत वरीष्ठांकडे तक्रार केल्याचीही त्यांनी माहीती दिली.
रिपाई युवक आघाडीचा मेळावा रविवारी डोंबिवली पुर्वेकडील सर्वेश सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन युवक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पप्पु कागदे यांना पाचारण करण्यात आले होते. युवकचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे आणि राहुल नवसागरे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. युवक आघाडीचे सल्लागार तथा रिपाई झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिक उघडे हे देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान गटबाजीमुळे या कार्यक्रमाला होत असलेला विरोध पाहता प्रमुख मार्गदर्शक कागदे यांनी कार्यक्रमाला न जाणो पसंत केले. एकंदरीतच तणावाचे वातावरण पाहता मेळाव्यापुर्वीच दोन्ही गटांना पोलिसांनी १५९ च्या शुक्रवारी नोटीसा देखील बजावल्या होत्या. परंतू रविवारी मेळावा सुरू असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागातील सम्राट चौकातील ठाकूरवाडीमध्ये या कार्यक्रमाचा लावण्यात आलेला बॅनर दुस-या गटाच्या कार्यकत्र्याकडून खाली उतरविण्यात आला तसेच बॅनरला काळे फासून लाथा बुक्यांनी प्रहार करण्यात आला. याप्रकरणी युवक आघाडीच्या वतीने विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जाधवांच्या कार्यकत्र्याचे हे कृत्य - उघडे
आम्ही आयोजित केलेल्या मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद लाभल्यानेच विरोधकांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. यातूनच बॅनरला काळे फासण्याचे कृत्य प्रल्हाद जाधव यांच्या कार्यकत्र्याकडून घडले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हे कृत्य करणा-यांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया रिपाई झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिक उघडे यांनी लोकमतला दिली.
त्यामुळेच म्हणून कार्यक र्ते भडकले- जाधव
मेळाव्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर आमचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र लहान तर कागदे यांचे छायाचित्र मोठया आकारात छापले होते. त्यामुळेच कार्यकत्र्याच्या भावना उफाळुन आल्या आणि यातुन हा प्रकार घडला. याची मला प्रारंभी माहीती नव्हती परंतू माहीती घेतल्यावर यामागचे कारण समोर आले. परंतू बॅनर प्रकरणी वरीष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली.