मीरा भाईंदर महापालिकेत सहाय्यक संचालक व नगररचनाकार नेमण्याची शासनास विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:00 PM2021-06-30T19:00:41+5:302021-06-30T19:03:44+5:30
Mira Bhayander Municipal Corporation :यूलसी घोटाळ्यात ठाणे शहर पोलिसांनी मीरा भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना २५ जून रोजी सुरत येथून अटक करण्यात आली.
मीरा रोड - यूएलसी घोटाळ्यात मीरा भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना पालिकेत सहाय्यक संचालक व नगररचनाकार पदी अधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली आहे.
यूलसी घोटाळ्यात ठाणे शहर पोलिसांनी मीरा भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांना २५ जून रोजी सुरत येथून अटक करण्यात आली. वास्तविक घेवारे हे २ जून पासून कामावर आले नव्हते. ठाणे न्यायालयात सुद्धा त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय झाला नव्हता.
वास्तविक नगररचनाकार असलेल्या घेवारे कडे पालिकेचे सहाय्यक संचालक पद सुद्धा प्रभारी म्हणून जून २०२० पासून दिले गेले होते. परंतु शासना कडून प्रतिनियुक्तीवर कोणी अधिकारी मिळावा यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत.
यूएलसी घोटाळ्यात पसार झालेल्या घेवारेला २५ जून रोजी अटक झाल्याचे पोलिसांनी पालिकेस कळवल्या नंतर मात्र आयुक्त दिलीप ढोले यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले आहे.
आयुक्तांनी पत्रात घेवारे याला अटक झाल्याचा तपशील मांडत सहाय्यक संचालक व नगररचनाकार पद भरण्याची विनंती केली आहे. घेवारेला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे त्याचे निलंबन अटळ मानले जाते. शासन आता नवीन अधिकारी कोण व कधी देतात या कडे लोकांचे लक्ष लागले आहे.