ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन
By Admin | Published: February 28, 2017 03:16 AM2017-02-28T03:16:53+5:302017-02-28T03:32:37+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्यानंतर आता प्रभाग क्रमांक- ११ मधून शिवसेनेनेदेखील निवडणुकीच्या कामकाजाबाबत आक्षेप घेतले आहेत
ठाणे : ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्यानंतर आता प्रभाग क्रमांक- ११ मधून शिवसेनेनेदेखील निवडणुकीच्या कामकाजाबाबत आक्षेप घेतले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये सुरुवातीला लावण्यात आलेला उलटा क्र म आणि मतदान झाल्यानंतर ज्या ठिकाणी मशीन ठेवल्या होत्या, त्या ठिकाणी रात्री काही गाड्याही आल्या असून त्याचे चित्रीकरणदेखील आपल्याकडे असल्याचा दावा शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी या उमेदवारांनी ठेवली आहे.
पालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागांमध्ये अनपेक्षित निकाल लागले आहेत. त्यामुळे काही ज्येष्ठ नगरसेवकांनादेखील याचा फटका बसला आहे. तब्बल २२ प्रभागांमध्ये मुख्य लढत भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये झाली असून काही ठिकाणी, तर भाजपाचे संपूर्ण पॅनलच निवडून आले आहे. प्रभाग क्र मांक ११ मध्येदेखील भाजपाचे पूर्ण पॅनल निवडून आले असून माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्यासह शिवसेनेमधून भाजपामध्ये दाखल झालेले कृष्णा पाटील आणि त्यांची पत्नी नंदा पाटील तसेच दीपा गावंड यांचा समावेश आहे. या पॅनलमधून शिवसेनेचे संपूर्ण पॅनलच पराभूत झाल्यानंतर या प्रभागातील शिवसेनेच्या सर्व पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रि येवरच आक्षेप घेतला आहे. मतदानाच्या दिवशी ज्या ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्या होत्या, त्या मशीनवरील जागांचा क्र मदेखील उलटा लावण्यात आला होता. दुपारनंतर तो सरळ करण्यात आला. मतदान झाल्यानंतर ज्या होली क्र ॉस शाळेमध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या, त्या ठिकाणी काही खाजगी वाहने रात्रीच्या वेळी असल्याचे चित्रीकरणदेखील असल्याचा दावा या सर्व उमेदवारांनी केला आहे.
या सर्व प्रक्रि येची चौकशी करण्याची मागणी सर्व उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात पालिका आयुक्तांना एक निवेदनदेखील दिले आहे. (प्रतिनिधी)