सल्लागार नेमण्याकरिता मागविलेल्या निविदा फेटाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:55+5:302021-06-18T04:27:55+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका डोंबिवलीतील तुकारामनगर परिसरात १० हजार चौरस मीटर जागेवर क्लस्टर योजना राबविणार आहे. महापालिकेचा हा ...
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका डोंबिवलीतील तुकारामनगर परिसरात १० हजार चौरस मीटर जागेवर क्लस्टर योजना राबविणार आहे. महापालिकेचा हा पहिला आणि पथदर्शी प्रयोग आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी अन्य ठिकाणीही केली जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याकरिता महापालिकेने मागविलेल्या निविदेस पहिल्या प्रयत्नात दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला. मात्र या दोन्ही कंपन्यांच्या निविदा फेटाळल्या असून, आता नव्याने निविदा मागविली जाणार आहे.
महापालिका हद्दीत अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे. धोकादायक इमारत कोसळून २०१५ मध्ये ठाकूर्ली येथे मोठी दुर्घटना झाली होती. तेव्हापासून क्लस्टर योजना राबविण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून कॉमन डीसीआर एमएमआर रिजनसाठी मंजूर करण्यात दिरंगाई झाली. त्यामुळे क्लस्टरचे घोडे अडले होते. सरकारने क्लस्टरचा मार्ग मोकळा केल्यानंतर महापालिकेने तुकारामनगरातील जागा क्लस्टर योजनेसाठी निश्चित केली आहे. ही जागा १० हजार चौरस मीटर आहे. क्लस्टर योजना राबविण्यासाठी सल्लागार नेमणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेला दोन निविदा प्राप्त झाल्या. त्या प्रशासनाने फेटाळून लावल्याने नव्याने निविदा मागविण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेल्या इमारती आणि बैठ्या चाळीतील नागरिकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाईल. विकासाकरिता पात्र - अपात्र ठरविले जाईल. केवळ इमारतींचा विकास होणार नाही, तर त्या ठिकाणी आरक्षणांतर्गत असलेले रस्ते, बगिचे, अन्य सोयीसुविधांचाही विकास केला जाणार आहे. जमिनीचा वापर रहिवास आणि वाणिज्य वापरासाठी कसा करता येईल, हे ठरविले जाणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत समूह इमारतीचा विकास दोन प्रकारे केला जाणार आहे. खाजगी जमीन मालक व बिल्डरही एकत्रित येऊन क्लस्टर योजनेकरिता प्रस्ताव तयार करू शकतो. त्यासाठीही १० हजार चौरस मीटर इतक्याच जागेचा आकार निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिका क्लस्टर योजना विकसित करू शकते. महापालिकेचा हा पहिला प्रयत्न आहे. हा यशस्वी झाला तर अन्य ठिकाणी महापालिकाच पुढाकार घेऊन क्लस्टर योजना राबविण्याच्या बेतात आहे.
...........
योजनेचे काम मंद गतीने
डोंबिवलीतील राघवेंद्र सेवा संस्था ही क्लस्टर योजना राबविण्यासाठी आठ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. या संस्थेने उपोषणे, मोर्चे, धरणे आंदोलने केली आहेत. त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची साथ लाभली आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, पाठपुरावाही सुरू ठेवला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार भेटी घेऊन क्लस्टर योजना राबविण्याची मागणी केली होती. त्यांच्या आदेशापश्चात डोंबिवलीत क्लस्टर योजनेला सुरुवात होत आहे. मात्र हे काम मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात योजनेची सुरुवात होण्यास आणखी पाच वर्षे लागतील, याकडे क्लस्टरसाठी पाठपुरावा करणारे सुनील नायक यांनी लक्ष वेधले आहे.
---------------------------------