बनावट ग्राहक पाठवून ९ पहाडी पोपटांची सुटका, ठाणे वनविभागाची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: October 10, 2023 11:10 PM2023-10-10T23:10:28+5:302023-10-10T23:10:41+5:30
तस्कराला ठाणे वन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी घाेडबंदर राेड भागातून ताब्यात घेतले
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घरात बेकायदा तब्बल नऊ पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी अजित पाटील (३५, रा. दहिसर, मुंबई) तस्कराला ठाणे वन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी घाेडबंदर राेड भागातून ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून या नऊ पहाडी पोपटांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाटील हा पहाडी पाेपटांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली हाेती. त्याच आधारे बनावट गिऱ्हाईक पाठवून या ठाणे वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्या पथकाने अजित याला फाउंटन हाॅटेलजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. सखाेल चाैकशीत त्याच्या घरातून मिळालेल्या नऊ पोपटांपैकी चार पोपटांचे उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान त्यांना रंगीत केले जात असल्याचे या कारवाईच्या पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितले. तसेच घरात या पद्धतीने पहाडी पोपट पाळणे, हा गुन्हा असल्याची माहिती सणस यांनी दिली. या तस्कराच्या साथीदारांचा शोध सुरू असून हे पहाडी पोपट आणखी किती जणांना विकण्यात आले आहेत, याबाबत वन विभाग अधिक तपास करत आहेत.