ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवा- आमदार, वकीलांचे पोलीस आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:02 PM2018-08-20T22:02:23+5:302018-08-20T22:15:05+5:30
वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले असून ही कोंडी सोडवावी, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. जनतेचे हित प्राधान्याने जपले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
ठाणे: शहरातील वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक शाखेने केलेल्या वाहतूकीच्या बदलांमध्ये बदल करावेत, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली. दरम्यान, हीच मागणी अॅड. ओंकार राजूरकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन केली.
गेल्या काही दिवसांपासून नौपाडा, भास्कर कॉलनी भागातील वाहतूक कोंडीबाबत आ. केळकर यांच्याकडे अनेक स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. याच अनुषंगाने केळकर यांनी स्थानिक नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, डॉ. राजेश मढवी, माजी नगरसेवक संतोष साळवी आणि राजेश ठाकरे यांच्या समवेत पोलीस आयुक्त फणसळकर यांची भेट घेऊन हे गा-हाणे मांडले. शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण असतांनाच वाहतूक शाखेने विविध ठिकाणी वाहतूकीत बदल केल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली आहे. वाहतूक शाखेने केलेल्या बदलांमुळे नौपाडा परिसरातील होणारी वाहतूक कोंडी आणि स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नव्याने केलेले बदल तातडीने रद्द करावेत तसेच एलबीएस मार्गावरील हरिनिवास याठिकाणी दुतर्फा बेकायदेशीर उभ्या राहणाऱ्या ट्रक, टेम्पोवर कारवाई करावी आणि गोखले रोडवर लावलेले दुभाजक काढून टाकावेत. तसेच तीन हात नाका येथील बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्ड काढून टाकावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. आयुक्तांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून जनतेचे हित प्राधान्याने जपले जाईल, असेही आश्वासन आयुक्त फणसळकर यांनी शिष्टमंडळाला दिले. याशिवाय, जादा प्रवासी नेणाºया तसेच शहरातील विविध वळणावर उभ्या बेकायदेशीरपणे उभ्या राहणा-या रिक्षा चालकांवरही वाहतूक शाखेतर्फे व्यापक मोहीम राबविली जाईल, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, नौपाडयात वाहतूक शाखेने केलेले वाहतूकीतील बदल हे फेल झाले असून अनेकदा रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीमध्ये अडकतात. अनधिकृत वाहतूकीवरही कारवाई करावी, मल्हार सिनेमा समोरील एकेरी वाहतूक पूर्वीप्रमाणेच दुहेरी करावी, या मार्गावरील दुभाजक काढावेत, वाहतूकीची कोंडी सोडविली गेली नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अॅड. राजूरकर यांनी दिला आहे.