मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:46+5:302021-06-19T04:26:46+5:30
भिवंडी : भिवंडीसह ग्रामीण भागात गुरुवारपासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच शहर व ग्रामीण भागातील अनेक सखल ...
भिवंडी : भिवंडीसह ग्रामीण भागात गुरुवारपासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच शहर व ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील पूर्णा राहनाळ हद्दीत रस्त्यावर एका गटाराच्या मॅनहोलमध्ये अचानक महिला पडल्याने तिला रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी सुखरूप बाहेर काढून तिचा जीव वाचवला. भिवंडी-ठाणे महामार्गावर टोल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली केली जाते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेकडे कंपनीचे लक्ष जात नसल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना या मार्गावर घडल्या आहेत.
पूर्णा येथील एका पेट्रोलपंपाबाहेर रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. त्यातूनच ती जात असताना रस्त्यालगतच असलेल्या गटाराचे मॅॅनहोल न दिसल्याने ती पडली. ती गळ्यापर्यंत पाण्यात बुडत असल्याचे नागरिकांना दिसताच तेथून जाणाऱ्या नागरिकांनी त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. दुसरीकडे एका कारमधील व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये शूटिंग करून नागरिकांना सावध करण्यासाठी त्याने व्हायरल केला. मात्र या महिलेच्या पायाला दुखापत झाली असून, ती महिला सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.