माशांच्या जाळ्यात अडकलेल्या सहा फुटांच्या अजगराची सुटका
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 11, 2024 17:00 IST2024-07-11T16:59:05+5:302024-07-11T17:00:13+5:30
वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या रेस्क्यू टीमने सापाची यशस्वी सुटका केली.

माशांच्या जाळ्यात अडकलेल्या सहा फुटांच्या अजगराची सुटका
ठाणे : पातलीपाडा येथे सहा फुटांचा इंडियन रॉक पायथन हा मासेमारीच्या जाळ्यात अडकला होता. वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या रेस्क्यू टीमने सापाची यशस्वी सुटका केली.
वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. जया चारियार यांच्याकडे सापाला नेण्यात आले, त्यांनी ते सोडण्यास योग्य असल्याचे घोषित केले. आवश्यक एसओपीचे पालन करून सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. माशांचे जाळे हे अधिक मृत्यूचे आणि वन्यजीवांच्या घटत्या लोकसंख्येचे प्रमुख कारण आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी दिली.
हा अजगर भारतीय उपखंड तसेच आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. याला इंडियन रॉक पायथॉन (Indian rock python) किंवा एशियन रॉक पायथॉन (Asian rock python) असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव पायथॉन मोलुरस (Python molurus) असून अजगरांची पायथॉन ही एक मोठी प्रजाती आहे.
याचा रंग मातकट किंवा फिकट पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे साधारण वेडेवाकडे चौकोनी आकाराचे ठिपके असतात. सामान्यपणे याची लांबी सु. ३ मी.पर्यंत असते; परंतु, सु. ६-७ मी. लांब असलेले भारतीय अजगर आढळले आहेत. डोक्यावर दोन्ही बाजूंनी निघणाऱ्या फिकट पिवळसर रंगाच्या जाड रेषा नाकावर एकत्र येतात. बाणाच्या टोकाप्रमाणे याचा आकार दिसतो. हे अजगर सहसा पाण्याच्या ठिकाणी आढळून येतात. त्यांना उत्तम पोहता येते अशी माहिती पाटील यांनी दिली.