नियमित पुस्तके वाचणारे जास्त निरोगी असतात व जास्त काळ जगतातः डॉ. नितीन पाटणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 02:30 PM2020-06-02T14:30:55+5:302020-06-02T14:33:56+5:30
ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 127 वा वर्धापनदिन ऑनलाइन साजरा झाला.
ठाणे : रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम लस करत असते. अन्नघटक व प्राणवायू ही आपली शस्त्रे आहेत, पण ग्रंथांशी सुद्धा याचा सबंध असतो. संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, नियमित पुस्तके वाचणारे जास्त निरोगी असतात, व जास्त काळ जगतात. म्हणूनच मराठी ग्रंथ संग्रहालय आपले ज्ञान आणि आरोग्य दोन्ही वाढवणारे कार्य करते. लोकांपर्यंत पुस्तके पोचवणारी घIरपोच पुस्तके योजना आहे. पण ती अधिक यशस्वी कशी होईल यासाठी काही प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत डॉ. नितीन पाटणकर यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथसंग्रहालयठाणे यांनी आपला १२७ वा वर्धापन दिन फेसबुक लाईव्ह माध्यमातून साजरा केला.
पाटणकर पुढे म्हणाले की, आता जी कोरोना महामारी चालू आहे त्याबद्दल उहापोह होणे गरजेचे आहे. या विषयावर मराठीत एकही ग्रंथच काय पण पुस्तिका देखील नाही. थोर यशस्वी लोकांच्या यशामागे ग्रंथ वाचनाचे किती महत्व होते हे नव्या पिढी समोर पोचवले पाहिजे. त्यातून ग्रंथ वाचनाची प्रेरणा वाढत जाईल. संस्थेने पूर्ण केलेल्या पुस्तकांच्या डिजिटायझेशन च्या कामाचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष अरुण करमरकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी कोरोनाच्या संकटामुळे सगळे संदर्भच बदलून गेले आहेत असे संगीतले. वाचन संस्कृती कशी जतन करता येईल, वाचक संख्या वाढेल की नाही, घरपोच पुस्तके दिली तरी कितीजण त्याचा लाभ घेतील...असे अनेक प्रश्न भविष्यात उभे आहेत. याची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील. या कार्यक्रमात आशा जोशी, वासंती वर्तक यांनी अभिवाचन केले व प्रथमेश लघाटे व युवराज ताम्हणकर यांनी बहारदार गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. संस्थेचे कार्यवाह संजीव फडके यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. १२७ व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आम्ही डिजीटल मंचावर आमचे पहिले पाऊल टाकले आहे.” असे ते म्हणाले. “दर शुक्रवारी संध्याकाळी ५.०० वाजता असा कार्यक्रम नियमित प्रसारित केला जाईल” असे संजीव फडके यांनी सांगितले.