राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला यश

By अजित मांडके | Published: September 26, 2023 12:18 PM2023-09-26T12:18:19+5:302023-09-26T12:18:28+5:30

राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील शर्विन कार्व्हालो याला मिळाली संशोधनासाठी पाठ्यवृत्ती, देशभरातील १० सर्वोच्च शोध निबंधामध्ये झाली निवड  

Research success of Rajiv Gandhi Medical College students |  राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला यश

 राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला यश

googlenewsNext

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात तृतीय वर्ष एमबीबीएसमध्ये शिकणारा शर्विन कार्व्हालो याला संशोधनासाठी पाठ्यवृत्ती मिळाली असून देशभरातील १० सर्वोच्च शोधनिबंधामध्ये निवड झाली आहे.                                                       

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इंडियन कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स या राष्ट्रीय पातळीवरील बालरोग शास्त्राच्या सर्वोच्च संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयएपी - आयसीपी संशोधन पाठ्यवृत्ती २०२२ साठी देशभर स्पर्धा घेण्यात आली. एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी यासाठी दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यंदा सुमारे ७०० हून अधिक शोधनिबंध एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी सादर केले होते. त्यातून अतिशय उच्च आणि अवघड अशा काठिण्य पातळी असलेल्या निवड चाचणीतून अंतिम १० शोधनिबंध संशोधन पाठ्यवृत्तीसाठी निवडले जातात. त्यात, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात तृतीय वर्ष एमबीबीएसमध्ये शिकणारा शर्विन कार्व्हालो याच्या शोधनिबंधाची निवड करण्यात आली आहे.

'नवजात अर्भकांच्या नाळेतील रक्ताच्या घटकांचा अर्भकांना होणाऱ्या संसर्गाच्या पूर्वलक्षी निदानासाठी होणारा उपयोग,' असे शर्विनच्या शोधनिबंधाचे शीर्षक आहे. या शोधनिबंधासाठी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहीत रोजेकर यांनी शर्विनला मार्गदर्शन केले. तसेच, विद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वाती घांघुर्डे, डॉ. सुनील जुनागडे, डॉ. जयेश पानोत, डॉ. जयनारायण सेनापती यांचेही त्यात योगदान होते. 

'आविष्कार'मध्येही झळकले विद्यार्थी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या 'आविष्कार' या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेतही राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील वत्सल जैन आणि शिवानी निरगुडकर या विद्यार्थ्यांना मेडीसीन आणि फार्मसी या गटात अनुक्रमे पहिले आणि दुसरे पारितोषिक मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी डॉ. मोहीत रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प पूर्ण केले. त्यांना डॉ. तुषार बागले, डॉ. रोहनकुमार हिरे, डॉ. राजेश्वर पाटे, डॉ. प्राची घोलप आणि डॉ. स्वाती घांघुर्डे या प्राध्यापकांचेही मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतर विद्यापीठ स्तरावरील संशोधन महोत्सवातही सहभाग घेतला होता

Web Title: Research success of Rajiv Gandhi Medical College students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.