बालवैज्ञानिकांमधून उद्याचे संशोधक घडतील-सवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:54 PM2018-12-09T22:54:36+5:302018-12-09T22:54:57+5:30
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.
विक्रमगड : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. विज्ञान प्रदर्शन ही अशीच एक उत्तम योजना असून याद्वारे संधी मिळालेले बाल वैज्ञानिक भविष्यातले संशोधक बनतील असा विश्वास आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी विज्ञान प्रदर्शनावेळी विक्रमगडयेथे व्यक्त केला.
पंचायत समिती विक्र मगडच्या शिक्षण विभागाच्या वतीने साखरे इथल्या छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं पारितोषिक वितरण सवरा यांच्या हस्ते झालं. विज्ञान, गणित, पर्यावरण, लोकसंख्या शिक्षण आदी विषयांचा या प्रदर्शनात समावेश होता. सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटात आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी १११ साहित्य प्रदिर्शत करून त्यांची शास्त्रीय माहिती दिली.
पालघर जिल्ह्यातल्या ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे तिथं शासनाच्या वतीनं विविध सवलती देण्यात येत आहेत. तर जिथं दुष्काळ जाहीर झाला नाही त्यांनाही सवलतींचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
विक्रमगड पंचायत समितीचे सभापती मधुकर खुताडे, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रास्ताविकाद्वारे गट शिक्षणाधिकारी बी.व्ही. मोकाशी यांनी विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली.
संधीचा योग्य फायदा घ्यावा
सवरा म्हणाले, आदिवासी आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील बुद्धिमत्ता, अंगभूत कौशल्य आणि जिज्ञासा असते. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं तर ते देखील जगाशी स्पर्धा करू शकतात हे अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यासाठी या भागातले शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य लाभ घ्यावा असं आवाहन करून पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.