आर्थिक निकषावर आरक्षण हे संविधान विरोधी – सुरेश सावंत यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:23 PM2019-01-30T13:23:59+5:302019-01-30T13:25:43+5:30

आर्थिक निकषावर आरक्षण हे संविधान विरोधी असे मत सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. 

Reservation on economic criteria is anti-Constitution - Suresh Sawant's opinion | आर्थिक निकषावर आरक्षण हे संविधान विरोधी – सुरेश सावंत यांचे मत

आर्थिक निकषावर आरक्षण हे संविधान विरोधी – सुरेश सावंत यांचे मत

Next
ठळक मुद्देआर्थिक निकषावर आरक्षण हे संविधान विरोधी – सुरेश सावंतअॅ ड निलेश खानवीलकरांनी युवकांशी साधला संवाद ‘स्त्री पुरुष समानता’ या विषयावर व्याख्यान  

ठाणे : ‘संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक न्यायाचा व समान संधीचा अधिकार दिला आहे. कित्येक शतकांपासून सामाजिक अन्याय सहन करत आलेल्या समाजातील दलित, महिला आदि घटकांना सामान संधी देण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर आधारित आरक्षण संविधानात दिले आहे. पण आर्थिक दृष्ट्या विपन्न घटकांना संविधानात आरक्षण नव्हते. या सरकारने दोन दिवसात कुठलीही चर्चा, विचार विनिमय न करता आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण देण्याचे विधेयक पारित करून संविधानाच्या मूळ ढाच्यात आणि उद्देश्यात बदल केला आहे. हे आरक्षण संविधान विरोधी असून ही संविधान बदलणारीच घटना आहे’ असे दृढ प्रतिपादन जेष्ठ संविधान अभ्यासक सुरेश सावंत यांनी ठाण्यातील राम नगर येथे केले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित ‘क्रांतीज्योती सवित्रिबाई फुले व्याख्यानमालिके’ मध्ये‘संविधान तुमचे आमचे’ या विषयावरील दहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ होते.  

      सावंत पुढे म्हणाले, ‘२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाने संविधांनाचा अंमल सुरू करण्याचे ठरवले. त्याआधी डिसेंबर १९४६ पासून संविधान निर्मिती सुरू झाली आणि २६ नोव्हेंबर १९४९ला संविधांनाचा स्वीकार केला गेला. आपल्या संविधांनातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द हा सविस्तर चर्चा करून मंजूर झाला आहे. ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य’ असे भारत या देशाचे स्वरूप असेल. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रत्येक भारतीय नागरिकास प्रदान करण्याचे उद्दीष्ट संविधानाने ठेवले आहे. येणार्‍या प्रत्येक सरकारने या उद्दिष्टांना समोर ठेवूनच राज्यकारभार करायचा आहे. संविधान सभेचे २८४ सदस्य हे देशातील प्रांतिक विधिमंडळाने निवडून दिले होते. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ते अत्यंत विद्वान होते या एकाच कारणामुळे त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले गेले असे नसून त्यांचे आपल्या देशाच्या पुढील वाटचालीबद्दलचे जे प्रगल्भ आणि सर्व समावेशक असे विचार होते, त्याचे महत्व जाणूनच त्यांना ते पद बहाल केले होते. संविधानात नमूद केलेला प्रत्येक शब्द बाबासाहेबांनी पारखून घेतला आहे, आणि म्हणूनच त्यांना घटनेचा शिल्पकार असे मानतात.’

      त्यांनी पुढे असेही संगितले की, ‘ २५ नोव्हेंबर १९४९ ल घटनेचा स्वीकार करताना बाबासाहेबांनी संसदेत जे भाषण केले त्यात त्यांनी सावधानीचा इशारा देताना म्हटले होते की, ‘आपण या पुढे विसंगतीपूर्ण जीवनात प्रवेश करणार आहोत. घटनेद्वारा आपण राजकीय लोकशाहीची व्यवस्था करत आहोत पण आपली सामाजिक परिस्थिती ही अतिशय विषमतेची आहे. जर पुढच्या काळात सामाजिक व आर्थिक न्याय झाला नाही तर अन्यायग्रस्त लोक ही राजकीय लोकशाहीची व्यवस्था उधळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत! आज आपण बघत आहोत की अजूनही दलितांवरील, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. ‘भारत माता की जय’ या घोषणेत अभिप्रेत असलेली भारतमाता म्हणजे नुसताच भूगोल नाही तर त्यात राहणारी माणसे मुख्यत्वेकरून आहेत. त्यांची सुंदरता म्हणजेच देशाची सुंदरता आहे. त्यांच्या जया शिवाय भारतमातेचा जय होवू शकत नाही,’

अॅ ड निलेश खानवीलकरांनी याच विषयावर युवकांशी संवाद साधला. .

      

       कळवा आणि चिराग नगर येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात अॅड. नीलेश खानविलकर यांनी संविधानामधील उद्देशिका सोप्या आणि सर्वांना समजेल अशा रितीने समजावून सांगितली. नागरिकांनी आपल्या अधिकारांबद्दल आणि कर्तव्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन त्याचे महत्व जाणले पाहिजे आणि त्यासाठी लढले पाहिजे, हे नागरिकांचे राज्य आहे, सर्व नागरिकांना समान हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे, हे त्यांनी लोकांवर बिंबवले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ अध्यक्ष स्थानी होते 

अविनाश कदम यांचे माजिवडा येथे संविधांनावर मार्गदर्शन

      माजिवडा येथे जेष्ठ सामजिक कार्यकर्ते अविनाश कदम यांनी ‘संविधान तुमचे आमचे’ या वरील व्याख्यानात सांगितले कि, ‘बाबासाहेब आंबेडकर संविधांनावर विवेचन करताना म्हणाले होते, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा एकसंघ विचार करायला हवे. त्यांची एकमेकापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच नष्ट करणे होय. समाजाची जाती पाती मध्ये असलेली विभागणी ही राष्ट्र विरोधी आहे कारण तिच्यामुळे समाजात मत्सर आणि तिरस्काराची भावना निर्माण होते आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी हे हानिकारक आहे.’

      समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने ‘व्याख्यान तुमच्या दारी, व्याख्याते तुमच्या घरी’या संकल्पनेनुसार ठाण्यात विविध लोकवस्त्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

‘स्त्री पुरुष समानता’ या विषयावर वैशाली नगर येथे व्याख्यान  

      स्त्री पुरुष समानता या विषयावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ती लतिका सू. मो. आणि सुप्रसिद्ध सूत्र संचालक हर्षदा बोरकर यांनी वैशाली नगर येथे मार्गदर्शन केले. मुलगी हाही वंशाचा दिवा असतो हे हर्षदा यांनी अनेक उदाहरणांनी पटवून दिले. लतिका  यांनी स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांच्या साथीने चालणे कसे महत्वाचे आहे हे सांगितले.

      ही व्यख्यान मालिका यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते सुनील दिवेकर, हर्षलता कदम,महिषा जोशी, मीनल उत्तुरकर, अजय भोसले, चेतन दिवे, आदेश शिंदे, ओंकार जंगम, विश्वनाथ चांदोरकर आदींनी खूप मेहनत घेतली.

Web Title: Reservation on economic criteria is anti-Constitution - Suresh Sawant's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.