मराठा समाजाला आरक्षण देणारच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 07:25 AM2023-09-08T07:25:07+5:302023-09-08T07:25:14+5:30
ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिवंगत आनंद दिघे यांच्या दहीहंडीला शिंदे यांनी हजेरी लावली.
ठाणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. परंतु हे आरक्षण देत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिवंगत आनंद दिघे यांच्या दहीहंडीला शिंदे यांनी हजेरी लावली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयाने अंतिम केले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झाल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपली निष्ठा विकली. बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नये, असेही ते म्हणाले.
विकासाचे थर
राज्यातही सरकार विकासाचे थर लावत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. देशात, राज्यात मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले तरी त्याचा काहीही परिणाम मोदींवर होणार नसून २०२४ची लोकसभेची हंडी मोदीच फोडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.