आरक्षण सोडत निघणार मंगळवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:29 AM2020-02-22T00:29:33+5:302020-02-22T00:29:56+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी केले जाहीर : पालिका निवडणुकीतील संभ्रम दूर
अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, आरक्षण सोडतीला विलंब होत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित केली असून २५ फेब्रुवारी रोजी सोडत निघणार आहे.
दोन्ही नगरपालिकांची निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील प्रभाग निश्चित करून त्या आराखड्याला मंजुरी घेणे बंधनकारक होते. मात्र, हा आराखडा मंजूर होण्यास विलंब झाल्याने आरक्षण सोडतीची तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या कार्यक्र मानुसार ही आरक्षण सोडत १८ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, आता या दोन्ही नगरपालिकांची आरक्षण सोडत २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेची सोडत सकाळी १० वाजता पालिका सभागृहात होणार आहे, तर बदलापूर नगरपालिकेची आरक्षण सोडत दुपारी ३ वाजता आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या सोडतीनंतर हरकती घेण्यात येणार आहेत. त्यांची सुनावणी आणि त्याला अंतिम मंजुरीसाठीही मुदत वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ मार्चपर्यंत ही मुदत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आचारसंहिता नेमकी लागणार कधी, हा प्रश्न अजूनही राजकीय पक्षांना सतावत आहे.
मोठ्या सभागृहात सोडत घ्या
च्अंबरनाथ नगरपालिकेच्या पालिका सभागृहात आरक्षण सोडत पार पडणार असल्याने याठिकाणी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवकांना जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे ही सोडत पालिका सभागृहात न घेता शहरातील इतर मोठ्या सभागृहात घ्यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.