ठाण्यातील पाेलिस अधिकाऱ्यांचे खांदेपालट; चार उपायुक्तांसह नउ सहायक आयुक्त
By जितेंद्र कालेकर | Published: February 1, 2024 11:02 PM2024-02-01T23:02:58+5:302024-02-01T23:03:05+5:30
विशेष शाखेच्या श्रीकांत पराेपकारींना भिवंडी तर मुख्यालयाच्या सुभाष बुरसेंना मिळाले ठाणे
ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे सुरु आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह १७ निरीक्षकांची आयुक्तालयाच्या बाहेर बदली झाली आहे. त्यापाठाेपाठ आता ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पाेलिस उपायुक्त श्रीकांत पराेपकारी, ठाण्याचे गणेश गावडे, िभवंडीचे नवनाथ ढवळे आणि मुख्यालयाचे सुभाषचंद्र बुरसे या चार उपायुक्तांसह नउ सहाय्यक आयुक्त आणि ३४ निरीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांच्या आयुक्तालयांतर्गत पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी बदल्या करुन खांदेपालट केले आहे.
पाेलिस आयुक्त डुंबरे यांच्या आदेशानुसार ठाणे शहर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांना विशेष शाखेत आणण्यात आले आहे. तर विशेष शाखेचे उपायुक्त डॉ श्रीकांत परोपकारी यांना भिवडी परिमंडळ २ मध्ये संधी मिळाली आहे. भिवंडीच्या नवनाथ ढवळे यांची मुख्यालय २ मध्ये बदली झाली आहे. तर मुख्यालयाचे सुभाषचंद्र बुरसे यांना ठाणे परिमंडळ १ मध्ये संधी देण्यात आली आहे.
त्याच बरोबर भिवंडी पूर्व विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांची विशेष शाखा २ येथे तर वर्तकनगर विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखेत, कळवा विभागाचे विजयसिंह भोसले यांची ठाणे शहर वाहतूक शाखेत , आर्थिक गुन्हे शाखेचे उत्तम कोळेकर यांची कळवा विभागात बदली झाली आहे. विशेष शाखा २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल वाघमारे यांची भिवंडी वाहतूक शाखेत, भिवंडी वाहतूक शाखेचे मंदार जवळे यांची वर्तकनगर विभागात बदली झाली आहे. नियंत्रण कक्षाच्या संजय साबळे यांची कल्याण वाहतूक शाखेत, विशेष शाखा ३ चे सहायक आयुक्त सिद्धार्थ गाडे यांची भिवंडी पूर्व विभागात बदली झाली असून मुख्यालय १ च्या सहाय्यक आयुक्त ममता डिसोजा यांची विशेष शाखा ३ येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय, नाैपाडयाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांची वाहतूक शाखेत, कळव्याचे कन्हैया थाेरात आणि निवृत्ती काेल्हटकर यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे. यासह आयुक्तालयातील ३४ निरीक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.