‘टोरंट’विरोधात रहिवासी आज उतरणार रस्त्यावर; साखळी उपोषणाच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:10 AM2019-10-31T00:10:52+5:302019-10-31T06:19:35+5:30
कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात तीव्र असंतोष
ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ-देसाई-दिवा विभागातील वीजवितरण आणि वीजबिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून त्याचे कंत्राट टोरंट या कंपनीला दिले आहे. यामुळे महावितरणला सक्षम करून टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरू असून आता त्याची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी टोरेन्ट हटाव, वीज ग्राहक बचाव अशी मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती टोरंट हटाव कृती समितीने दिली.
टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टोरेन्ट संदर्भात यापूर्वी वारंवार बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तीन वेळा बैठका लावण्यात आल्या. मात्र, त्या रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मध्यतंरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्यावर योग्य तो तोडगा निघालेला नाही. भिवंडीतील रहिवासी या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत, त्यामुळे उद्या या भागात खाजगीकरण झाले तर येथील समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे.
या उलट महावितरणचे सक्षमीकरण करण्यात यावे, नवीन भरती प्रक्रिया राबवावी, प्रिपेड मीटर लावावेत अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.
तर नोव्हेंबरपासून उपोषण
आता विविध आंदोलने, मोर्चे काढूनही कळवा आणि मुंब्रा भागात या कंपनीच्या माध्यमातून कामे सुरू झाली आहेत. तसेच येत्या ३१ आॅक्टोबरच्या रात्रीपासून ते खऱ्या अर्थाने वेगाने काम सुरूअसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढत असल्याचे सांगितले. यानंतरही शासनाला जाग आली नाही तर मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, राजू पाटील हेदेखील सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.