सावरकरनगरात रहिवाशांचे पाण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:45 AM2021-09-05T04:45:10+5:302021-09-05T04:45:10+5:30
ठाणे : एकीकडे कळव्यातील पाणी समस्येच्या मुद्द्यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कान टोचले असताना आता सावरकरनगर ...
ठाणे : एकीकडे कळव्यातील पाणी समस्येच्या मुद्द्यावरून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कान टोचले असताना आता सावरकरनगर भागातील नागरिकांनादेखील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांनी शनिवारी येथील पाण्याच्या टाकीजवळच आंदोलन करून पाणी द्या, पाणी द्या, अशा घोषणा देऊन आंदोलन केले.
ठाणे शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही आजही शहरातील अनेक भागांना कुठे कमी दाबाने तर कुठे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कळव्यातील नागरिकांनादेखील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाकडून मिळविले आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सावरकरनगरातील रहिवाशांनी राजीव शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. मागील चार महिन्यांपासून पाण्याची समस्या सुरू आहे. दोन दिवसांआड करूनही पाणी येत नाही, त्यातही याच भागात पाण्याची टाकी असतानाही येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते, असा सवालही त्यांनी केला आहे. येथील पाण्याच्या टाकीवर असलेला एक पंप मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळेदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. एकूणच या भागात पाण्याची समस्या असूनदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीचे हे आंदोलन केल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. या आंदोलनानंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती त्यांनी दिली.