केडीएमसीच्या कारवाई पथकाने डोके फोडल्याचा रहिवाशांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:42 AM2021-09-03T04:42:25+5:302021-09-03T04:42:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील धोकादायक असलेली बाबाजी चाळ गुरुवारी तोडण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पथकाने सुरुवात ...

Residents allege that KDMC's action squad beheaded them | केडीएमसीच्या कारवाई पथकाने डोके फोडल्याचा रहिवाशांचा आरोप

केडीएमसीच्या कारवाई पथकाने डोके फोडल्याचा रहिवाशांचा आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील धोकादायक असलेली बाबाजी चाळ गुरुवारी तोडण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पथकाने सुरुवात केली. त्यास विरोध केल्याप्रकरणी पथकाने आपले डोके फोडून रक्तबंबाळ केल्याचा आरोप एका ७३ वर्षांच्या रहिवाशाने केला आहे. त्यामुळे संतप्त चाळकऱ्यांनी दाद मागण्यासाठी मनपा मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करीत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान, कारवाई पथकाने संबंधित रहिवाशाला जखमी केले नसून त्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचा खुलासा प्रभाग अधिकाऱ्याने केला आहे.

बाबाजी चाळ धोकादायक असल्याने मनपाने तिला नोटीस दिली होती. ही चाळ पाडण्यासाठी मनपाचे कारवाई पथक गुरुवारी दुपारी १२ वाजता पोहोचले होते. मात्र, मनपाने चाळीस कोणतीही नोटीस न देता पाडकाम सुरू केल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. मनपाने कारवाईपूर्वी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे चाळीतील रहिवाशांनी आम्ही बेघर होणार असून, आम्ही जायचे कुठे, असा सवाल करत कारवाईस विरोध केला. रहिवाशांनी कारवाईवेळी उपस्थितीत असलेल्या पोलिसांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही.

कारवाई पथकाने आपल्या डोक्यात दांडा मारल्याने आपण रक्तबंबाळ झालो, अशी माहिती स्वत: चाळीतील रहिवासी राणा देवराज प्रजापती (वय ७३) यांनी दिली. त्यामुळे अन्य रहिवाशांनी मनपा मुख्यालयात धाव घेत जखमी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे रहिवाशांनी आयुक्तांना बोलवा, तरच येथून परत जाऊ, असा पवित्रा घेतला. प्रशासनाने प्रजापती यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागविली. मात्र, आधी आयुक्तांना बोलवा नंतर उपचार करून घेऊ, या मतावर प्रजापती ठाम होते. यामुळे बराच वेळ प्रवेशद्वाराजवळ गोंधळ सुरू होता.

दरम्यान, ठाण्यात मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई पथकाने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता कारवाईदरम्यान रहिवाशांकडून पथकाने हल्ला केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. यावरून अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होत आहे.

‘घटनेचा व्हिडिओ आहे’

या संदर्भात प्रभाग अधिकारी राजेश सावंत म्हणाले, प्रजापती यांचा आरोप चुकीचा आहे. कारवाई पथकाने त्यांना मारहाण केलेली नाही. स्वत:ला त्यांनी जखमी करून घेतले आहे. त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. ही चाळ धोकादायक झाली आहे. या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हीजेटीआयकडून करून घेतल्यानंतर नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे.

----------------------

Web Title: Residents allege that KDMC's action squad beheaded them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.