डोंबिवलीचे रहिवासी वासाने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:27 AM2017-11-13T06:27:52+5:302017-11-13T06:28:27+5:30
एमआयडीसी विभागात वायू आणि जलप्रदूषणाने पुन्हा डोके वर काढल्याचे रविवारी दिसून आले. काही दिवसांपुर्वी निवासी भागातील नाल्यांमधून हिरवट रंगाचे पाणी वाहात असताना रविवारी लालसर रंगाचे पाणी वाहात असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. या भागात उग्र वासाने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून घसा खवखवणे आणि डोकेदुखी आदी त्रास सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एमआयडीसी विभागात वायू आणि जलप्रदूषणाने पुन्हा डोके वर काढल्याचे रविवारी दिसून आले. काही दिवसांपुर्वी निवासी भागातील नाल्यांमधून हिरवट रंगाचे पाणी वाहात असताना रविवारी लालसर रंगाचे पाणी वाहात असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. या भागात उग्र वासाने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून घसा खवखवणे आणि डोकेदुखी आदी त्रास सुरू आहेत.
केवळ एमआयडीसीच नव्हे तर पहाटेच्या वेळी रेल्वे स्थानक परिसर, रामनगरपर्यंतच्या भागात उग्र वास येत असल्याने निम्मी डोंबिवली पुन्हा प्रदूषणाच्या छात्रेत असल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकार सातत्याने घडत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई कुचकामी ठरत असल्याची टीका रहिवाशांनी केली आहे.
एमआयडीसी फेज २ नजीकच्या परिसरातील निवासी भागातील मोठय़ा नाल्यातून रविवारी सकाळी गडद लाल रंगाचे पाणी वाहताना आढळून आले. तेथील रहिवाशी विश्वास माटल आणि रामदास मेंगडे यांनी याची माहिती तत्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीला दिली. संबंधित यंत्रणेने त्यांचा प्रतिनिधी घटनास्थळी पाहणीसाठी पाठविला. प्रदुषणाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने ही परिस्थिती पुन्हा उदभवत असल्याचे ते म्हणाले. कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.