पाण्याचा ठणठणाटामुळे गृहसंकुलातील रहिवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:04+5:302021-03-04T05:16:04+5:30
डोंबिवली : केडीएमसीकडून महिन्यातील दुसरा आणि चौथा मंगळवारी पाण्याचे शटडाउन घेतले जात असल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत ...
डोंबिवली : केडीएमसीकडून महिन्यातील दुसरा आणि चौथा मंगळवारी पाण्याचे शटडाउन घेतले जात असल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरील ४०० सदनिका असलेल्या सर्वाेदय लीला सोसायटीत आठवडाभरापासून पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात येत नसल्याने येथील रहिवाशांची गैरसोय होत आहे. तक्रारी करूनही समस्येचे निराकरण होत नसल्याने रहिवाशांनी माजी नगरसेवक साई शेलार यांच्या पुढाकाराने मंगळवारी मनपाच्या विभागीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर समस्या सोडवली जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
२३ फेब्रुवारीला शटडाउन घेण्यात आले होते. तेव्हापासून ‘सर्वाेदय लीला’मध्ये पाणीसमस्या भेडसावत आहे. शटडाउननंतर साधारणपणे एक ते दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. परंतु, ‘सर्वाेदय लीला’मध्ये पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही. केवळ अर्धा तास येणारे पाणी अत्यंत कमी दाबाने असल्याने ४०० कुटुंबांना पिण्याचे पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडाभर ही समस्या कायम असल्याने रहिवाशांमध्ये विशेषत: महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नोव्हेंबरमध्ये पाणीसमस्या भेडसावली होती. त्यावेळी पाण्याच्या जोडण्या वाढवून घ्या, असा सल्ला दिला गेला होता. परंतु, सोसायटीला दिलेल्या पाणी जोडण्यांना पुरेसे पाणी येत नसताना अतिरिक्त जोडण्यांना पुरेसे पाणी येईल का? असा सवाल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांची भेट घेतल्यानंतर मात्र समस्या निकाली निघाली होती. परंतु, पुन्हा पाणीटंचाईची समस्या उद्भवल्याने सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देशमाने, सचिव लक्ष्मण इंगळे आदी पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक शेलार, उपअभियंता मनोज सांगळे आणि कनिष्ठ अभियंता सुनील वाळुंज यांची भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेधले. यावेळी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून समस्येचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जादा पाणी सोडले जाईल, असे सांगितले. तसेच समस्या सुटेपर्यंत पाण्याचे टँकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
२० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ
९० फुटी व रेल्वे समांतर रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत असल्याने भविष्यात नियोजनाअभावी पाणीटंचाईला रहिवाशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपाकडून येथे २० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ प्रस्तावित आहे. हा जलकुंभ लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.
------------