वारंवार वीज खंडित होत असल्याने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:13+5:302021-08-24T04:44:13+5:30
डोंबिवली: वीज प्रवाहात कमी-जास्त, कमी-अधिक डीम होणे असे प्रकार डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात वारंवार होत असून, तशा तक्रारी ...
डोंबिवली: वीज प्रवाहात कमी-जास्त, कमी-अधिक डीम होणे असे प्रकार डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात वारंवार होत असून, तशा तक्रारी महावितरणकडे चार दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रिक उपकरणे बिघडण्याची शक्यता असल्याने वेळीच त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांच्या घरी येऊन इमारत, बंगल्यांची केबल तपासणी करून घ्यावी. त्यात काही खराबी असू शकते, असे सांगितले आहे; परंतु हा प्रश्न एका बिल्डिंगपुरता नसून अनेक जणांचा आहे. महावितरणला यातील फॉल्ट मिळत नसल्याची टीका नागरिकांनी केली. अशीच समस्या काही महिन्यांपूर्वी झाली होती, त्यावेळी काही रहिवाशांचे इलेक्ट्रिक उपकरणे खराब झाली होती. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची येथील वीज समस्येबाबत अनेकदा भेट घेऊनही निवासी भागात अजूनही वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
नागरिकांनी वीज बिल भरण्यास थोडा जरी उशीर केल्यास वीज जोडणी तोडण्यात येते. काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याची वीजजोडणी अवघे १३० रुपये वीज बिल बाकी राहिल्याने तोडली होती. लोकमतने त्यावर आवाज उठवताच तातडीने तो वीज पुरवठा पूर्ववत केल्याचे सर्वश्रुत असल्याचे रहिवासी प्रतिनिधी राजू नलावडे म्हणाले.
सध्या नोकरी, शालेय शिक्षण इत्यादी ऑनलाइन असल्याने अखंडित वीज पुरवठा अतिअत्यावश्यक झाला आहे. एमआयडीसीच्या निवासी भागामधील वीज बिल वेळेत भरण्याचे प्रमाण महावितरणच्या विभागणीत ए प्लसमध्ये येत आहे; मात्र तरीही सतत वीज घालवून ग्राहकांवर महावितरणने अन्याय करू नये, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे.