शांतीनगरचे रहिवासी अनधिकृत पार्किंगने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:27+5:302021-08-17T04:45:27+5:30
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर वसाहतीतील सेक्टर २ मधील रहिवासी अनधिकृत पार्किंगने त्रस्त झाले असून या पार्किंगवर ...
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर वसाहतीतील सेक्टर २ मधील रहिवासी अनधिकृत पार्किंगने त्रस्त झाले असून या पार्किंगवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
शांतीनगर सेक्टर २ मध्ये प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला रहिवासी नसलेले बाहेरून येणारे लोक आपली वाहने उभी करून जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा वाहने उभी केली जात असल्याने येथील रस्ता अरुंद झालेला आहे. त्यामुळे रिक्षासुद्धा येणे अवघड बनले आहे.
यामुळे वाद, वाहतूककोंडीचा जाच नित्याचा झाला असून एखादी नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना किंवा कोणी गंभीर असल्यास रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनेसुद्धा या बेकायदा वाहन पार्किंगमुळे घटनास्थळी मदतीसाठी पोहोचू शकणार नाहीत अशी गंभीर परिस्थिती असल्याचे मनसेच्या उपशहर अध्यक्षा दृष्टी घाग यांनी सांगितले.
मनसे व राहिवाशांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी सदर परिसराची पाहणी करून समस्या जाणून घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले. यावेळी मनसेचे पदाधिकारी दृष्टी घाग, दिलीप घाग, सुनीता लोंढे, प्रसाद वंजारे, प्रसाद लोंढे व रहिवासी उपस्थित होते.