ठाण्यात पोलिसांच्या मदतीमुळे श्रीरंग सोसायटीतील रहिवाशांना मिळाला दिलासा: मार्गक्रमणासाठी दिली बोटीतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 08:34 PM2019-08-04T20:34:06+5:302019-08-04T20:45:07+5:30

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ठाण्यातील अनेक नाल्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती रविवारी निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले. तर काही रस्त्यावर तीन फूटांपर्यंत पाणी होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी आणि वागळे इस्टेट परिसरात मदतकार्य राबविले.

Residents of Thane's Shrirang Society get help from police station | ठाण्यात पोलिसांच्या मदतीमुळे श्रीरंग सोसायटीतील रहिवाशांना मिळाला दिलासा: मार्गक्रमणासाठी दिली बोटीतून मदत

घराबाहेर न पडण्याचे केले पोलिसांनी आवाहन

Next
ठळक मुद्देनागरिकांना पुरविले पाणी आणि अन्नपदार्थांची पाकिटेघराबाहेर न पडण्याचे केले पोलिसांनी आवाहनवागळे इस्टेटमध्येही अनेक घरांमध्ये शिरले होते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राबोडी पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या मदतीमुळे श्रीरंग सोसायटीतील रहिवाशांना रविवारी दिलासा मिळाला. मार्गक्रमणासाठी बोट आणि पोलिसांच्या वाहनाची मदत मिळाल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी दिवसभर सुरु असलेला पाऊस रविवारीही दुपारपर्यंत सुरुच होता. त्यामुळे वृंदावन सोसायटी येथून जाणाऱ्या नाला पूर्णपणे भरुन वाहू लागला. पाणी जायलाच जागा न मिळाल्याने श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी आणि आनंदपार्क या परिसरात सुमारे तीन फूट पाणी भरले होते. या भागातून मार्गक्रमण करतांना वाहन चालकांसह पादचाऱ्यांचीही मोठी कसरत झाली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी आणि पोलीस निरीक्षक दिलीप रासम यांच्या पथकाने ज्या भागात मोठया प्रमाणात पाणी भरले होते, तो श्रीरंग सोसायटीकडे येणारा रस्ता तसेच जुने राबोडी पोलीस ठाणे ते वृंदावन सोसायटीचा टीएमटी बस थांब्याचा रस्ता रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वा. च्या दरम्यान पूर्णपणे बंद केला होता. या मार्गावर मोठया प्रमाणात पाणी भरलेले असल्यामुळे श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी आणि आनंद पार्क येथील रहिवाशांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन सोमवंशी यांनी बोटीतून ध्वनीक्षेपकाद्वारे केले. यावेळी रस्त्यात महिलेला त्यांनी बोटीतूनच वृंदावन सोसायटीकडे सोडविले. तर अन्य तीन महिलांना पोलीस व्हॅनमधून जुने पोलीस ठाणे ते कॅसलमील मार्गावर सोडविले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोणीही बाहेर न पडल्याने याठिकाणी कोणतीही जिवित हानी झाली नाही. दुपारी १२ ते ३ वा. च्या दरम्यान याठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साचले होते. स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील आणि राबोडी पोलिसांनी या परिसरातील रहिवाशांना पाण्याच्या बॉटल आणि अन्न पदार्थांच्या पाकीटांचाही पुरवठा केल्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, वागळे इस्टेट परिसरातील रामचंद्रनगर, धर्मवीनगर आणि हाजुरी येथील ६० ते ७० घरांमध्ये पाणी शिरले होते. रविवारी पहाटे ४.३० वा.च्या सुमारास धर्मवीरनगर येथील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या साहाय्याने या भागात मदतकार्य केले. नौपाडा पोलिसांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना मदतीचा हात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, वागळे इस्टेट परिसरातील रामचंद्रनगर, धर्मवीनगर आणि हाजुरी येथील ६० ते ७० घरांमध्ये पाणी शिरले होते. रविवारी पहाटे ४.३० वा.च्या सुमारास धर्मवीरनगर येथील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या साहाय्याने या भागात मदतकार्य केले. नौपाडा पोलिसांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना मदतीचा हात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Residents of Thane's Shrirang Society get help from police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.