मीरारोड येथे दरवर्षीच्या पुरामुळे रहिवाशांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:17 AM2019-10-05T01:17:37+5:302019-10-05T01:18:04+5:30
महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराने परिसरात झालेल्या बेकायदा भरावाच्या गंभीर समस्येने दरवर्षी होणाऱ्या पूरस्थितीने मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता, पूजा पार्क, विनयनगरमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे.
मीरा रोड : महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराने परिसरात झालेल्या बेकायदा भरावाच्या गंभीर समस्येने दरवर्षी होणाऱ्या पूरस्थितीने मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता, पूजा पार्क, विनयनगरमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. महापालिका आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळत असल्याने रहिवासी महासंघातील ३३ गृहसंकुलांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला आहे.
मीरा रोडच्या झंकार कंपनीमागे - काशिगावखाली आलेल्या सिल्व्हर सरिता या गृहसंकुलाच्या मागील भागात बेकायदा मातीचा भराव दिवसरात्र करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक महिला या महापालिकेत सातत्याने आपल्या तक्रारी घेऊन यायच्या. परंतु, महापालिका प्रशासनासह महसूल व पोलीस विभागाचेही भरावमाफियांशी लागेबांधे असल्याने आजतागायत कोणतीच ठोस कारवाई केली नाही.
मोठ्या प्रमाणात झालेल्या भरावामुळे येथील पाणी वाहून जाणारे नैसर्गिक नाले अरुंद झालेच, शिवाय पाणी साचून ठेवणारे पावसातील पाणथळ नष्ट केले गेले. भराव करून मोठ्या इमारतींचे प्रकल्प पालिकेच्या मंजुरीने बांधण्यात आले, जेणेकरून सिल्व्हर सरिता आदी वसाहती सखल झाल्या. नंतर, बांधलेले विनयनगर, पूजा पार्कही पाण्याखाली आले.
दरवर्षी पावसाळ्यात येथे सात ते नऊ फूट पाणी साचते. घरातून बाहेर पडणे विद्यार्थी, रहिवाशांना शक्य होत नाही. महत्त्वाचे काम असेल वा कोणी येणार असेल, तरी बोटीचा वापर करावा लागतो. तळ मजल्यावरील नागरिकांचे तर संसार असून नसल्यासारखे झाले आहेत. कधी पाण्याची पातळी वाढेल आणि घर, दुकान सोडून बाहेर निघावे लागेल, याचा नेम नसतो. वरच्या मजल्यांवर राहणारे शेजारीच तळमजल्यावरील पूरग्रस्त शेजाऱ्यांना मदतीचा हात देत आपला शेजारधर्म पाळतात. सततच्या पूरस्थितीने तळमजल्यावरील बांधकाम निकृष्ट होऊन इमारतीलाच धोका निर्माण होऊ लागला आहे.
या परिसरातील ३३ गृहसंकुलांमध्ये राहणाºया नागरिकांच्या मरणयातना संपण्याचे नाव नसताना दुसरीकडे निवडणुका आल्या की, राजकारणी नेहमीच समस्या सोडवण्याची आश्वासने देत मते मागायला येतात. परंतु, निवडणूक झाली की, आश्वासनेही पावसाच्या पुरात वाहून जातात.
स्थानिक नगरसेवकही आयुक्तांना, पालिका अधिकाºयांना घेऊन येतात आणि इतिहासाचे व आश्वासनांचे मोठे दाखले देऊन निव्वळ आजपर्यंत रहिवाशांची फसवणूक करत आल्याचा संताप रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
रहिवासी महासंघाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालिका आयुक्तांना गुरुवारी लेखी निवेदन देऊन विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. सिल्व्हर सरिता, विनयनगर, पूजा पार्क परिसरात भरावाची समस्या गंभीर असूनही महापालिका मात्र उदासीन आहे.
तोडग्याबाबत पालिका गंभीर नाही
२० सप्टेंबर रोजी स्थानिक नगरसेवक व उपमहापौर चंद्रकांत वैती, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर व स्थानिक नगरसेवकांनी अधिकाºयांसह परिसराला भेट दिली. २७ सप्टेंबर रोजी आयुक्तांची रहिवाशांनी भेट घेतली. पण, आमच्या समस्येवर तोडगा काढण्यात पालिका गंभीर नसून ठोस तोडगा सांगितलेला नाही. पालिकेच्या उदासीनतेमुळे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार रहिवाशांनी स्पष्ट केला आहे.