मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:48 AM2024-12-02T05:48:59+5:302024-12-02T05:49:13+5:30

ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Resignation of MNS Thane District President Jadhav; Resignation accepting responsibility for defeat | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी विधानसभेत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे रविवारी दिला. मात्र,  ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीमध्ये जाधव यांनी स्वत: ठाण्यातून निवडणूक लढवली. मात्र, भाजपचे संजय केळकर यांनी विजयाची हॅट्ट्रिक  साधली. या मतदारसंघात उद्धवसेनेचे राजन विचारे दुसऱ्या क्रमांकावर, तर मनसेचे जाधव तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. बाजूच्या ओवळा-माजिवडा मतदारसंघातही मनसेच्या संदीप पाचंगे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्याचप्रमाणे  कल्याण ग्रामीणमधूनही शिंदेसेनेचे राजेश मोरे यांनी जिल्ह्यातील मनसेचे एकमेव आ. राजू पाटील यांचा पराभव केला. जाधव आणि पाटील यांच्यासह जिल्ह्यात मनसेने १२ उमेदवार उभे केले होते. यापैकी एकही आमदार निवडून न आल्यामुळे मनसेची चांगलीच नामुष्की झाली. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातून काही पदाधिकाऱ्यांनीही जाधव यांच्या निवडणूक काळातील कार्यपद्धतीबद्दल पक्ष नेतृत्वाकडे  नाराजी व्यक्त केल्याचेही समजते.

या सर्वच पार्श्वभूमीवर जाधव यांनी काम करताना माझ्याकडून कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, अशीही आर्जव पत्रातून राज यांच्याकडे करत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

जाधव यांच्यावर मदत न मिळाल्याचा आराेप

विधानसभा निवडणूक काळामध्ये ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्याकडून निवडणुकीतील उमेदवार, तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना याेग्य मदत आणि सहकार्य मिळाले नसल्याचा आराेप मनसे पालघरचे विक्रमगड तालुकाध्यक्ष याेगेश पाटील यांनी केला आहे.

कारवाईपूर्वीच राजीनामा?

पाटील यांच्यासह पालघरमधील उपजिल्हाध्यक्ष विशाल जाधव, विपुल पटेल यांच्यासह बहुतांश तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निवासस्थानी रविवारी भेट घेतली. याच भेटीमध्ये या पदाधिकाऱ्यांनी पराभवाची मीमांसा करताना आपली गाऱ्हाणी मांडली. जाधव यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. या भेटीची माहिती जाधव यांच्यापर्यंत आल्यानंतर पक्षातून कारवाई हाेण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Web Title: Resignation of MNS Thane District President Jadhav; Resignation accepting responsibility for defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे